घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!

युरोपातील अस्थिरतेचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा

‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी घुसखोरी, देशाची अंतर्गत सुरक्षा, मतदार यादी शुद्धीकरण वर भाष्य

एसआयआर प्रक्रियेचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन

‘रिजीम चेंज’ ची भाषा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान नाकारण्याची भाषा

कणकवली (प्रतिनिधी) : युरोपातील प्रगत देशांमध्ये महागाई, शिक्षण आणि घुसखोरीच्या प्रश्नांवरून आंदोलने होत असताना त्यामागील कारणांचा भारतीय नागरिकांनीही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज युरोपमध्ये जे घडत आहे, त्याची पुनरावृत्ती भारतात होऊ द्यायची नसेल, तर देशाची लोकशाही, अंतर्गत सुरक्षा आणि राष्ट्रीय अस्मिता जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहिले पाहिजे. मतदार यादीतील बांगलादेशी आणि रोहिंग्या सारखे घुसखोरांची नावे वगळण्यासाठी एसआयआर प्रक्रिया समजून घेऊन तिला सहकार्य केले पाहिजे, असे परखड प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युरोपमधील सामाजिक अस्थिरता, बेकायदा घुसखोरी, देशाची अंतर्गत सुरक्षा, मतदार यादी शुद्धीकरण आणि लोकशाही व्यवस्थेसमोरील आव्हाने यावर आपली भूमिका मांडली. केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर भारतीय नागरिक म्हणून या घटनांकडे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.

युरोपमधील घडामोडींचा संदर्भ देताना मंत्री राणे म्हणाले की, नेदरलँडसारख्या देशाचे दरडोई उत्पन्न मोठे असतानाही महागाई आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलने होत आहेत. जर्मनी, फ्रान्स, इटली आणि पॅरिससारख्या ठिकाणीही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. युरोपमधील अनेक देश आर्थिकदृष्ट्या प्रगत असतानाही तेथे अशा प्रकारची परिस्थिती का निर्माण होत आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. सुपर मार्केटमधील फ्रीजरवर सायबर हल्ले करून खाद्यपदार्थ खराब करण्यासारखे आणि त्या देशांची शांतता बिघडविण्याचे प्रकार घडविले जात आहेत.या घटनांमागील परिस्थिती समजून घेत भारताने वेळीच सावध होणे आवश्यक आहे. कोणतेही काम करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन घुसखोरी केली जाते आणि नंतर स्थायिक होऊन बळजबरी केली जाते हा घोस्कोरांचा मूळ स्वभाव आहे हे भारतीयांनी ओळखले पाहिजे.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा प्रश्न भारतासमोर गंभीर आव्हान म्हणून उभा आहे. रोजगारासाठी भारतात प्रवेश केल्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणे, स्थानिक व्यवस्थेत सहभागी होणे आणि पुढे लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होणे, ही चिंतेची बाब आहे. कामगार म्हणून देशात येऊन येथील व्यवस्थेवरच मालकी सांगण्याची प्रवृत्ती स्वीकारता येणार नाही. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा भारतीय नागरिकांचा आहे. बाहेरच्या देशातील नागरिकांनी भारतात येऊन आपले लोकप्रतिनिधी निवडावेत का, असा सवालही मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.

पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या पडताळणीचा संदर्भ देत त्यांनी सुमारे ८० लाख घुसखोर मतदार यादीत असल्याचा दावा केला. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेचे महत्त्व नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. मतदार यादीत आपल्या गावाचे, जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नागरिक नसलेल्या व्यक्तींची नावे असतील, तर ती वगळली जाणे आवश्यक आहे. पात्र भारतीय मतदारांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाही व्यवस्थेत सरकार बदलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे; मात्र आंदोलनांच्या माध्यमातून न्यायव्यवस्था आणि लोकशाही संस्थांनाच नाकारणे, संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न करणे, ही गंभीर बाब आहे. ‘रिजीम चेंज’च्या नावाखाली देशातील विद्यमान व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाही व्यवस्थेचा आदर राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे आणि बौद्ध धर्मीयांची धार्मिक स्थळे पाडली जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत राणे यांनी तेथील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. धर्माच्या आधारावर ओळख पटवून लोकांना लक्ष्य केले जात असेल, तर अशा घटनांकडे केवळ शेजारील देशातील घडामोडी म्हणून पाहता येणार नाही. देशातील प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप हा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष असून, म्हणूनच पक्षाच्या माध्यमातून अशा चिंतन संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला देशाच्या विकासापेक्षा देशात अस्थिरता निर्माण करण्यात अधिक रस असल्याचा आरोपही त्यांनी केला. युरोपमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीप्रमाणे भारतातही अशांतता निर्माण करून घुसखोरांचे राष्ट्र उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली.

बुद्धिजीवी वर्ग आणि जागरूक नागरिकांनी भाजपची भूमिका आहे म्हणून नव्हे, तर देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी या प्रक्रियेकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे. देशाची लोकशाही, राष्ट्रीय अस्मिता आणि सुरक्षित भविष्य जपण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!