सोबती सोशल फाऊंडेशनतर्फे संविता आश्रमातील निराधार बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा !

स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करण्यापूर्वी निराधार व वंचित बांधवांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची संस्थेची परंपरा…

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार, वंचित आणि गरजू बांधवांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्यासाठी सोबती सोशल फाऊंडेशन ही संस्था सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहे. स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करण्यापूर्वी समाजातील निराधार बांधवां सोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याची सुंदर परंपरा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाही कायम राखली.

याच उपक्रमांतर्गत नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमातील निराधार बांधवांना सोबती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी फराळ आणि वैयक्तिक सामग्री किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आश्रमातील बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांच्यासाठी दिवाळीचा सण अधिक आनंददायी झाला.

समाजातील वंचित घटकांसोबत सण-उत्सव साजरे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हा या उपक्रमामागील संस्थेचा स्तुत्य हेतू आहे. यावेळी सोबती सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सावंत, सचिव महेश बुरटे, खजिनदार दीपक झाडराव, उपाध्यक्ष राजू कुळणकर, जितेंद्र लोणे, यशवंत साटम, अविनाश सर्वेकर, प्रसाद शेजवलकर आणि मनोज धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निराधार बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा आणि माणुसकीच्या नात्याला अधिक दृढ करणारा सोबती सोशल फाऊंडेशनचा हा दिवाळी उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.

error: Content is protected !!