औषध खरेदीची फाईल दोन दिवसांत मंजूर करा; अन्यथा पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काही औषधांचा तुटवडा असतानाच औषध खरेदीची फाईल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीसाठी पडून असल्याची बाब आजच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली. याबाबत सभेत सभापतीसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन दिवसात फाईल मंजूर न झाल्यास पालकमंत्र्यांकडे तक्रार करू आणि ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यालयात आणून बसवू अशा इशारा सदस्या सावी लोके यांनी सभेत दिला.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा गुरुवारी (५ नोव्हेंबर) येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, सदस्य सावी लोके, श्वेता धरणे, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, सुनील पारकर, संतोष पारकर, रुपेश पावसकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. मात्र त्यांना आवश्यक असलेली काही औषधे तेथे मिळत नाहीत. ती उपलब्ध व्हावीत यासाठी उपाययोजना का केल्या जात नाहीत असा प्रश्न सदस्या सावी लोके यांनी उपस्थित केला. यावर औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध आहे ना मग खरेदी का केली जात नाही असे सांगत याबाबत सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यावेळी औषध खरेदीची फाईल १५ दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर खरेदी केली जाणार आल्याचे सभेत सांगण्यात आले. यावर सदस्या सावी लोके यांनी सही करण्या एवढ्या वेळ सीईओ यांच्याकडे नाही का? आरोग्य विषयक फाईल एवढे दिवस प्रलंबित कशी काय राहते असा प्रश्न केला. ही फाईल दोन दिवसात मंजूर न झाल्यास औषधांसाठी नागरिकांना कार्यालयात बसविण्यात येईल तसेच प्रसंगी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल असा इशारा दिला.

बाधकाम अभियंता यांनी सभेला उपस्थित रहावे
प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थान दुरुस्ती कामांची अंदाजपत्रके तयार करण्यास बांधकाम विभागाकडून विलंब होत असल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्याला माहिती देता आली नाही. यावरही सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली आणि पुढील सभेला बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी स्वतः उपस्थित रहावे असे निर्देश सभापतींनी दिले.

आयुष्मान कार्ड प्रगती समाधानकारक नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्मान कार्ड काढण्याचा प्रक्रियेबाबत सभापतींनी नाराजी व्यक्त केली. नियोजन. नसल्याने काम पूर्ण होत नसल्याचे सांगत अद्यापही १ लाख ५० हजार आयुष्मान कार्ड काढलेले नाही.सर्वांचे आयुष्मान कार्ड काढ़ण्यासाठी नियोजन करण्यात यावे असे आदेश सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले.

error: Content is protected !!