सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा अनोखा आदर्श घालून देत तांबळडेग, ता. देवगड येथील निवृत्त आशा सेविका व सामाजिक कार्यकर्त्या रश्मी रवींद्र कांदळगावकर (वय ६२) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या या निर्णयातून समाजामध्ये देहदानाबाबत जनजागृती होण्यासोबतच सामाजिक कर्तव्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे.
मरणोत्तर देहदान हे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि भावी डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी अत्यंत मोलाचे योगदान ठरते. स्वतःच्या मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याची भावना ठेवून श्रीमती कांदळगावकर यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या स्तुत्य सामाजिक कार्याची दखल घेत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. हा देहदान संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवलीचे सचिव सुशील परब यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुका अध्यक्ष मकरंद सावंत, सचिव सुशील परब, सहसचिव यशवंत (विनू) महाडिक, अमोल भोसले, सुहासिनी कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय रासम, डॉ. सवेंश तायशेटे, अधिपरिचारिका थिटे सिस्टर, निकम सिस्टर, तसेच पती रवींद्र कांदळगावकर उपस्थित होते.
रश्मी कांदळगावकर यांनी घेतलेला हा निर्णय समाजातील इतरांनाही देहदानासाठी प्रेरणा देणारा असून, मृत्यूनंतरही मानवतेची सेवा करण्याचा एक आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.










