स्व. नागेश नागठाणे यांच्या कुटुंबासाठी गृहउद्योगाची उभारणी; मातोश्री मंगलाबाईंच्या हस्ते थाटात उद्घाटन
मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना काळाच्या पडद्याआड गेलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पूर्णा येथील दिवंगत पत्रकार स्व. नागेश नागठाणे यांच्या कुटुंबासाठी उभारण्यात आलेल्या गृहउद्योगाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकाराच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला केवळ सहानुभूती न दाखवता त्यांच्या हाताला काम आणि कुटुंबाला उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम व्हॉईस ऑफ मीडियाने राबविला आहे.
दि. १८ रोजी दुपारी २ वाजता पूर्णा येथे या गृहउद्योगाचे उद्घाटन दिवंगत पत्रकार स्व. नागेश नागठाणे यांच्या मातोश्री मंगलाबाई नागठाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव इंगोले यांची उपस्थिती होती.
पत्रकारांच्या कुटुंबाच्या पाठीशी संघटनेने उभे राहावे : विजय चोरडिया
यावेळी प्रास्ताविक करताना व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. पत्रकार हा समाजाचा आरसा असून, समाजातील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम तो आयुष्यभर करीत असतो. मात्र, एखाद्या पत्रकाराचे अकाली निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळते. अशा वेळी त्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही संपूर्ण पत्रकार परिवाराची जबाबदारी आहे. नागठाणे कुटुंबासाठी उभारण्यात आलेला हा गृहउद्योग त्यांच्या स्वावलंबनाचा आधार ठरेल आणि त्यांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचबरोबर पत्रकारांच्या घरांचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गायरान अथवा शासकीय जागेतून पत्रकारांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जागा उपलब्ध झाल्यास सकारात्मक विचार करू : जीवराज डापकर
उपविभागीय महसूल अधिकारी जीवराज डापकर यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पत्रकारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत योग्य प्रस्ताव आल्यास नियमानुसार त्याचा सकारात्मक विचार करून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
व्हॉईस ऑफ मीडियामुळे जगण्याची नवी आशा : उमादेवी नागठाणे
यावेळी दिवंगत पत्रकार नागेश नागठाणे यांच्या पत्नी उमादेवी नागठाणे यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता माणूस निघून गेल्याने आमच्यावर अत्यंत कठीण परिस्थिती ओढवली. मात्र, व्हॉईस ऑफ मीडियाने आमच्या कुटुंबाला गृहउद्योग सुरू करून दिल्यामुळे जगण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आधार मिळाला. पत्रकारांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. आमच्या कुटुंबासाठी पुढाकार घेणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.
या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनायक देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, अन्वर लिंबेकर, भास्कर पंडित, मोहन बारहाते, सचिन रायपत्रीवार, श्रीकांत हिवाळे, डॉ. गुलाब इंगोले, जगदीश जोगदंड, वसंत पापंटवार, सुरेश मगरे, मारुती देसाई, आनंद ढोणे, नवनाथ पारवे, नारायण सोनटक्के, सदाशिव सूर्यवंशी, शेख सलीम सय्यद, कृष्णा काळे, श्रीहर घुले संजय पांचाळ, निशाद शेख, उत्तम जोंधळे, अनिल अहिरे श्रीकांत हिवाळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मगरे, आभार गजानन नाईकवाडे यांनी केले. पत्रकाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला मदतीचा केवळ शब्द न देता प्रत्यक्ष कृतीतून आधार देण्याचा आदर्श व्हॉईस ऑफ मीडियाने या उपक्रमातून निर्माण केला आहे.











