सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास्ट्राईब संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार; समाजभूषण संदीप कदम यांच्यासह राज्यस्तरीय कोअर कमिटीचे आवाहन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यातील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांच्या संवैधानिक हक्कांचे संरक्षण तसेच आरक्षणाच्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कास्ट्राईब संघटनांच्या वतीने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न, विविध विभागांतील रिक्त अनुशेष पदांची भरती, जुनी पेन्शन योजना, नियमित नोकरभरती आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवाविषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा आंदोलनात्मक एल्गार पुकारण्यात आला आहे.
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष समाजभूषण संदीप कदम यांच्यासह राज्यस्तरीय कोअर कमिटीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. राज्यस्तरीय कोअर कमिटीमध्ये महासचिव सुरेश तांबे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, सरचिटणीस प्रभाकर सोनडवले, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुर्गुळे, सरचिटणीस सतीश कावळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर, केंद्रीय सचिव शिवाजी बिवलकर आणि सल्लागार राजू ओळी यांचा समावेश आहे. या राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कास्ट्राईब संघटनांचे पदाधिकारीही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.
राज्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ तातडीने लागू करावा, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातील प्रलंबित शासन निर्णयांची अंमलबजावणी करावी, पदोन्नती व सरळसेवा भरतीमधील रिक्त अनुशेष पदे तातडीने भरावीत, कंत्राटी नोकरभरती धोरणाचा पुनर्विचार करून नियमित नोकरभरती करावी, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी, प्राथमिक शिक्षकांसाठी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, दिव्यांग शाळांमधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, विविध विभागांतील वेतनविसंगती दूर करून सातव्या वेतन आयोगानुसार पात्र कर्मचाऱ्यांना लाभ द्यावेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
«पदोन्नतीतील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, रिक्त अनुशेष पदांची तातडीने भरती, जुनी पेन्शन योजना, नियमित नोकरभरती, शिक्षकांना १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना, वेतनविसंगती दूर करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना संविधानिक हक्कांनुसार न्याय देणे.»
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या आंदोलनात क कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा महासचिव किशोर कदम, माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पेंडुरकर, महासचिव अभिजित जाधव, उपाध्यक्ष किशोर यादव व संदीप नागभिडकर, ग्रामसेवक कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर व महासचिव प्रशांत जाधव, प्राथमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर व सचिव मनोजकुमार अटक, पर्यवेक्षिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा उत्का हजारे खोत, जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित पावरा, सफाईकामगार कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष दीपक तांबे व माजी अध्यक्ष दया तांबे, आरोग्य कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक कांबळे व माजी अध्यक्ष महेंद्र कदम आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, सफाईकामगार, आरोग्य कर्मचारी तसेच विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संविधानिक तरतुदींनुसार न्याय द्यावा, यासाठी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रश्नांची प्रभावी सोडवणूक होत नसल्याने आता राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद कर्मचारी, सफाईकामगार, आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजभूषण संदीप कदम यांच्यासह राज्यस्तरीय कोअर कमिटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कास्ट्राईब संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.











