जिल्हा बँकेकडून दररोज एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट; सिंधुरत्न योजनेतूनही मदत – दिलीप रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने ठेवले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांनी केले.

आचिर्णे येथे कृषी विभाग आत्मा, पंचायत समिती वैभववाडी आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किसान गोष्टी’ अंतर्गत कलिंगड लागवड मार्गदर्शन व पशुपालक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पशुधन संगोपन तसेच कलिंगड लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे प्राचार्य एम. पी. पाटील, मालवण येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी, आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, आत्मा अध्यक्ष मंगेश कदम, जयसिंग रावराणे, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, महेश संसारे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.
दिलीप रावराणे म्हणाले, तालुका आत्मा समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे नियोजनबद्ध आयोजन करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार दुधाळ जनावरे खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सिंधुरत्न योजनेतून जनावरे खरेदीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे उत्पन्नाचे अतिरिक्त साधन म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सभापती सिद्धेश रावराणे म्हणाले, शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांनी अधिकाधिक पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असून, कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांचे सहकार्य आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजनांचाही लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघाचे प्राचार्य एम.पी.पाटील यांनी दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना नियमित व शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा चांगला पर्याय असल्याचे सांगितले. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी गोकुळ दूध संघ खंबीरपणे उभा आहे. संघामार्फत शेतकऱ्यांसाठी ३२ विविध योजना उपलब्ध असून, तळकोकणात दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांनी कलिंगड लागवड, पीक व्यवस्थापन व नियोजनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कलिंगड हे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असून, एका एकरात सुमारे चार हजार रोपांची लागवड करता येते. कलिंगडाला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध असल्याने योग्य नियोजन केल्यास या पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते. कलिंगड लागवडीबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक गाय पाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंगेश कदम, प्रिमेश वाघ, महेश संसारे तसेच जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे यांनी मानले.

error: Content is protected !!