मुंबईतच हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा एल्गार,

नागपूर आंदोलनाच्या तयारीसाठी २५ नोव्हेंबरला ओरोस येथे जाहीर सभा

ओरोस (प्रतिनिधी) : मुंबईच्या गिरण्यांमध्ये आयुष्य वेचलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाकडे सुमारे १ लाख ७४ हजार १७२ गिरणी कामगार व वारसदारांनी सदनिकांसाठी अर्ज केले असताना, शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ १५ हजार ८७० सदनिकांचे वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या मागण्यांसाठी ९ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर गिरणी कामगार राज्यव्यापी जनआंदोलनाच्या माध्यमातून भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या तयारीसाठी बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गिरणी कामगारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतच हक्काचे घर मिळावे, सदनिकेसाठी अर्ज करू न शकलेल्या कामगारांना पुन्हा संधी मिळावी, १९८१ च्या संपातील कामगारांचा पुनर्वसन योजनेत समावेश करावा, संक्रमण शिबिरांतील रिक्त घरे तातडीने वितरित करावीत, खोट्या संमतीपत्रांची छाननी करून ती रद्द करावीत, तसेच बॉम्बे डाईंग व न्यू ग्रेट मिलच्या घरांची सोडत त्वरित काढावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मंगेश नेवगे आणि ज्येष्ठ गिरणी कामगार कृष्णा भोगवेकर यांच्या आयोजनातून ही सभा होत असून, चळवळीचे कार्याध्यक्ष रमाकांत बने यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
नागपूर येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि ९ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक मंगेश नेवगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!