तळेरे आणि आंबडवे कॉलेजसाठी नवीन सुविधांना मंजुरी!
तळेरे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय नोंदणी दरापेक्षा कमी विद्यार्थी नोंदणी असलेल्या जिल्ह्यातील ‘आदर्श महाविद्यालयांच्या’ धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. २२ मे २०२६ रोजी याबाबतचा सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला असून, यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या दोन महाविद्यालयांसह राज्यातील एकूण ७ आदर्श महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहेत मुख्य बदल आणि तरतुदी?
विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर निश्चित
ज्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचे नोंदणी प्रमाण कमी आहे, तेथे शिक्षकीय पदांची संख्या ठरवण्यासाठी २०:१ हे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार:
आदर्श महाविद्यालय, तळेरे (जि. सिंधुदुर्ग): येथे २६६ विद्यार्थी असून १३ शिक्षकीय पदे मंजूर करण्यात आली आहेत.
आदर्श महाविद्यालय, आंबडवे (जि. रत्नागिरी): येथे १८७ विद्यार्थी असून ९ शिक्षकीय पदे निश्चित करण्यात आली आहेत.
रोजगारभिमुख व कौशल्य आधारित अभ्यासक्रम:-
राज्यात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (NEP-२०२०) अनुसरून, या महाविद्यालयांमधील पारंपारिक अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने कमी केले जाणार आहेत. आगामी ५ वर्षांत ही सर्व महाविद्यालये पूर्णतः कौशल्य आधारित व रोजगारभिमुख अभ्यासक्रम राबवतील.
वेतन आणि मानधन वाढ:
महाविद्यालयातील अध्यापकीय पदांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सहाय्यक प्राध्यापकांच्या वेतनश्रेणीनुसार मूळ वेतन (रु. ५७,७००/-) आणि त्यावर शासनाच्या प्रचलित दराने महागाई भत्ता (सध्या ५८%) अनुज्ञेय करण्यात आला आहे. तसेच अनुभवी प्राध्यापकांच्या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकी १ सेवानिवृत्त प्राचार्य/मानद प्राध्यापक यांची नियुक्ती करण्याची मुदत ५ वर्षांपर्यंत वाढवली आहे.
पायाभूत सुविधांसाठी कोटी रुपयांचा निधी
आदर्श महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास आणि परिरक्षण (Maintenance) खर्चाची मर्यादा आधी प्रतिवर्ष ५० लाख रुपये होती, जी आता वाढवून प्रतिवर्ष १ कोटी रुपये करण्यात आली आहे.
अतिरिक्त आर्थिक भार मंजूर:-
या सर्व सुधारणांमुळे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुमारे १० कोटी रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक भारास शासनाने मंजुरी दिली असून, याद्वारे कोकणासह राज्यातील या मागासलेल्या भागातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.










