कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवलीचा २० ते २१ नोव्हेंबर या कालावधीत प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा, शास्त्रोक्त संगीत रसग्रहण कार्यशाळा, पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव असलेला २७ वा त्रिसूत्री संगीत महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २० रोजी सकाळी ९ वा. नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी सुयोग कुंडलकर, आरती कुंडलकर, पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्राचे गुरु पं. डॉ. समीर दुबळे, चारुदत्त फडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शुक्रवार २० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत वामनदाजी शास्त्री गायन स्पर्धा होईल. सायंकाळी ७ ते ९.३० यावेळेत वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धेतील विजेत्याचे गायन होईल. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची विद्यार्थिनी ऋचा पिळणकर हिचे गायन होईल. प. डॉ. अरविंद थत्ते यांचे शिष्य सुयोग कुडलकर यांचे एकल संवादिनी वादन होईल.
शनिवार २१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० यावेळेत पं. प्रभाताई अत्रे यांच्या बंदीशीवर आरती कुंडलकर यांची रसग्रहण कार्यशाळा होईल. सायंकाळी ७ ते ७.४० यावेळेत संस्थेच्या तबला प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी अभिनव जोशी यांचे एकल तबला वादन होईल. रात्री ८ ते ९.३० यावेळेत पं. माणिका भिडे व प. रत्नाकर पै यांच्या शिष्या तथा पद्यश्री अश्विनी भिंडे-देशपांडे यांचे शास्त्रोक्त गायन होईल.
रविवार १२ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० यावेळेत रसग्रहण कार्याशाळा, सायंकाळी ६ ते ७ यावेळेत पं. जितेंद्र अभिषेक बुवांच्या नाट्यपदांचे निलेश धाक्रस, ईश्वरी तेजम, पल्लवी पिळणकर, श्रृती सावंत, पांडुरंग सुतार यांचे संगीत सुर सरस होईल. सायं. ७ ते ८ यावेळेत प. शमा भाटे यांच्या शिष्या श्रेया कुलकर्णी व प्रमोद वाघ यांचे कथ्यक नृत्य होईल. रात्री ८. १५ ते ९.३० यावेळेत पं. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आरती कुंडलकर यांचे शास्त्रोक्त गायन होईल. तरी या सांगीतिक महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











