जिजाऊ संस्थेतर्फे कासार्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांना २,७८४ वह्यांचे मोफत वाटप!

कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये ३५ हजार २८० वह्यांचे वितरण होणार!

सलग तिसऱ्या वर्षी कासार्डे विद्यालयाला शैक्षणिक मदत

तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण, आरोग्य,रोजगार मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे ध्येय घेऊन कार्यरत आहे.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थापक श्री. निलेश सांबरे यांच्या पुढाकारातून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये संस्थेची सामाजिक कार्याची प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना २ हजार ७८४ वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. संस्थेचे प्रवक्ते अमर राऊत तसेच सदस्य सचिन गोताड आणि विजय सुवरे इतर मान्यवरांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला.

याप्रसंगी कासार्डे शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी संजय पाताडे, कासार्डे गावचे उपसरपंच गणेश पाताडे, विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन दीपक सावंत, विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक ए. पी. घुले, ज्येष्ठ शिक्षिका सौ. ऋचा सरवणकर तसेच अन्य शिक्षक उपस्थित होते.
विशेष म्हणजे, कणकवली तालुक्यातील विविध शाळांमध्ये संस्थेच्या माध्यमातून एकूण ३५ हजार २८० वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे माहिती अमर राऊत यांनी आमच्या प्रतिनीधीला दिली.

कासार्डे विद्यालयात सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा हा उपक्रम ठरत आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे प्रवक्ते अमर राऊत म्हणाले की, जिजाऊ संस्थेमार्फत कोकणातील गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी तीन हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांसह युवक -युवतींना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी संस्थेची २१ अभ्यासिका केंद्रे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र. मुख्याध्यापक ए. पी. घुले यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षिका सौ. ऋचा सरवणकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!