कणकवली (प्रतिनिधी) : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती दिलेल्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आश्रमाच्या चिकूच्या बागेतील पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ विचारपीठ येथे विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभिवादन सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे , ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश लब्दे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या इतिहासातील २१ नोव्हेंबर १९५५ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक आहे. याच दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी आणि मुंबई महाराष्ट्रात रहावी या मागणीसाठी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला होता. हुतात्मा चौकात हजारो नागरिक एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी शांततेच्या मागार्ने निदर्शने करत असताना पोलिसांनी आंदोलन दडपण्याकरिता आंदोलकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात १०७ हुतात्म्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेस जिल्ह्यातील मान्यवरांनी व नागरिकांनी पस्थित रहावे, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.











