आंबा-काजू बागायतदारांना ‘एआय’ तंत्रज्ञानाचे बळ!

जिल्ह्यातील ३३५ बागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू

ड्रोन फवारणीसाठी यंत्रणा व निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बागायतदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३३५ आंबा-काजू बागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक बागायतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करा. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यावर भर द्या. अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. तसेच बागायतदारांना ड्रोनद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही

आंबा-काजू बागायतदारांच्या उत्पादनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या या एआय आधारित उपक्रमाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासुर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, बारामती शास्त्रज्ञ डॉ. विश्वजीत बाबले, डॉ. विवेक भोईटे डॉ. भूषण गोसावी, ओंकार ढोबळे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे सतीश सावंत आधी उपस्थित होते.

पारंपरिक आंबा काजू बागायतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. त्यामुळे एआय प्रणालीचा वापर केवळ प्रायोगिक स्वरूपात न राहता तो प्रत्यक्ष बागायतदारांच्या दैनंदिन कामकाजात उपयोगी ठरला पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली. मोबाईल ॲपच्या माध्यमातून हवामान, बागेची स्थिती, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि आवश्यक कृषी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी प्रशिक्षणावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ड्रोन फवारणीमुळे वेळ, मजुरी आणि फवारणीचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे बागायतदारांना ही सुविधा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गच्या आंबा-काजू शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ देऊन उत्पादनक्षमता वाढविणे, बागायतदारांचा खर्च कमी करणे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली.

error: Content is protected !!