आगामी हंगामात पाच हजार मेट्रिक टन काजू बी खरेदीचे उद्दिष्ट; तालुकास्तरावर खरेदी केंद्रे उभारणार
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील काजू, सुपारीसह आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य आणि स्थिर बाजारभाव मिळावा, यासाठी आता सहकाराच्या माध्यमातून गोव्याची बाजारपेठ खुली करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोव्यातील फोंडा येथील ‘गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्था मर्यादित’ला भेट देऊन त्यांच्या यशस्वी कार्यपद्धतीचा अभ्यास केला. आगामी हंगामात जिल्ह्यातून किमान पाच हजार मेट्रिक टन काजू बी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जिल्ह्याच्या आठही तालुक्यांत खरेदी केंद्रे उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
गोवा बागायतदार संस्थेने सहकाराच्या बळावर स्वतःची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली आहे. शेतमालाची खरेदी, प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणन यांची सक्षम साखळी उभी करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेची साखळी विकसित करण्याचा जिल्हा बँकेचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र भिडे यांच्याशी चर्चा केली. संस्थेच्या ॲग्रो प्रोसेसिंग युनिटची पाहणी करून प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहितीही घेतली.
या अभ्यास दौऱ्यात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, गणपत देसाई, विद्याधर परब, तुळशीदास रावराणे, अशोक सारंग, सुनील उकिडवे, दीपक ठाकूर, अमित आवटी, निलेश पवार, विलास ठाकूर, योगेश वालावलकर, चंद्रशेखर देसाई, डॉ. प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, काजू प्रक्रिया उद्योजक, तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
आठही तालुक्यांत खरेदी केंद्रांचे नियोजन
सिंधुदुर्गातील काजू उत्पादकांना दरवर्षी बाजारभावातील चढ-उताराचा सामना करावा लागतो. अनेकदा योग्य बाजारपेठेअभावी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील काजू विक्री संघ, सहकारी संस्था, बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकत्र आणण्याचे नियोजन आहे. तालुकास्तरावर खरेदी केंद्रे आणि जिल्हास्तरावर मध्यवर्ती यंत्रणा उभारून शेतीमालाची संघटित खरेदी-विक्री केली जाणार आहे.
प्रतवारीनुसार दर; नफ्यातही शेतकऱ्यांचा वाटा
काजू आणि सुपारीची प्रतवारी करून दर्जानुसार दर निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी हंगामापासून पाच हजार मेट्रिक टन काजू बी खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुपारीसाठीही स्वतंत्र खरेदी धोरण आखण्यात येणार आहे. केवळ खरेदी-विक्रीपुरती ही व्यवस्था मर्यादित न ठेवता स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग, पॅकिंग आणि स्वतंत्र ब्रँडिंग विकसित केले जाणार आहे. त्यामुळे शेतीमालाला अधिक मूल्य मिळण्याबरोबरच विक्रीतून निर्माण होणाऱ्या नफ्यातील लाभांशही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
सहकारातून बाजारपेठेची नवी दिशा
या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील शेतीमालाला गोव्यासारख्या मोठ्या बाजारपेठेची जोड मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी, दर्जानुसार भाव, स्थानिक प्रक्रिया आणि सक्षम विपणन व्यवस्था या माध्यमातून शेतीमालाच्या मूल्यवृद्धीला चालना मिळू शकते. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ उत्पादक न ठेवता बाजारपेठेतील भागीदार बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.












