खारेपाटणच्या गडावर 300 मशालींचा लखलखाट…
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक दुर्ग खारेपाटणवर दि.१५ नोव्हेंबर २०२६ रोजी एका सुवर्ण क्षणाची नोंद झाली.अनेक वर्षे झाडा-झुडपात विलुप्त झालेला या गडाचा इतिहास पुन्हा जागृत झाला. कोकणचे शिलेदार संघ आयोजित या अभूतपूर्व सोहळ्यात पहिल्यांदाच ३०० मशाली प्रज्वलित करून संपूर्ण दुर्ग प्रकाशमान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन कोकणचे शिलेदार संघ तसेच शिव-शंभू विचार मंच आणि ग्रामपंचायत खारेपाटण व खारेपाटण ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या शिवकार्यात हिंदवी प्रतिष्ठान, राजापूर यांनीही मोलाचे सहकार्य केले.कणकवली पोलीस विभागाने बंदोबस्तात व्यस्त असतानाही कार्यक्रमात सहभागी होऊन संपूर्ण सहकार्य केले.
सोहळ्याची सुरुवात गडदेवता पूजनाने
कार्यक्रमाची सुरुवात गडदेवता पूजनाने झाली. हे पूजन खारेपाटण गावातील प्रतिष्ठित नागरिक व श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर गुरव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शिव-शंभू विचार मंच कोकण प्रांत अध्यक्ष मा. भूषण साटम,अभ्यासक वक्ते संजय शिंदे, कोकणचे शिलेदार संघाचे दुर्गसेवक व हिंदवी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई, भूषण साटम, हिंदवी प्रतिष्ठान राजापूरचे अध्यक्ष महेश मयेकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते देखील गडपूजन करण्यात आले.
वीरगळीचे पूजन व अमर वीरांना मानवंदना
यावेळी खारेपाटण किल्ल्यावर असलेल्या व गडाचा इतिहास सांगणाऱ्या वीरगळींचे पूजन करून त्या अमर वीरांना मानवंदना देण्यात आली. हे पूजन शिव-शंभू विचार मंचतर्फे करण्यात आले. यामध्ये मा. भूषण साटम, संजय शिंदे, पत्रकार उदय दुधवडकर, पत्रकार संजय खानविलकर, जयदीप देसाई व दोन्ही संस्थांचे दुर्गसेवक सहभागी झाले होते. खारेपाटण येथील श्री देव रवळनाथ मंदिरा पासून मशाल फेरीला सुरवात करण्यात आली. दुर्गावसेवकांच्या वतीने खारेपाटणचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर येथे नारळ वाढवून मुख्य मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर बस स्थानकावर मानवंदना (गारद) देऊन मशाली दुर्ग खारेपाटणवर नेण्यात आल्या आणि ३०० मशालींचा भव्य-दिव्य सोहळा सुरू झाला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरल्या कणकवली- बिडवाडीच्या दुर्गसेविकांनी सादर केलेल्या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी. त्यांच्या धाडसी सादरीकरणामुळे सोहळ्याची भव्यता आणखी वाढली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व सन्मानचिन्ह (फोटो फ्रेम) देऊन आभार मानण्यात आले. सर्वाधिक गड-मोहिमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल दुर्गसेवक कु. साहिल गुरव याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि दुर्गप्रेमींचे आयोजकांनी मनापासून आभार मानले.












