दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली

उद्या शुक्रवारी (दि. 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार

वैभववाडी (प्रतिनिधी): दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारी (दि. 2 जून) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) घेण्यात आली होती. गेल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल लागला होता. तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण व सदरचा निकाल Mahahsscboard. In व Mahresult.Nic.In या संकेतस्थळावर उद्या दुपारी १ वाजता संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांना 12 जून पर्यंत गुणांची पडताळणी, करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!