दशावतार मित्राला नाट्यप्रयोगातून गोळा केली ३५०००/- रु आर्थिक मदत
रसिकांचाही मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील माळगाव येथील तरुण दशावतार कलावंत कुमार विराज माळगांवकर यांच्यासमोर अनेक संकटे उभी ठाकली आहेत. गरीब परिस्थितीत जन्ममलेला विराज तरुणपणातच दशावतार कलेकडे वळला .या कलेतून मिळणाऱ्या पैशातून उदारनिर्वाह चालत होता. ८४ वर्षाचे थकलेले वडील व अलीकडेच अचानक आईला आलेले आजारपण यामुळे विराजला दशावतार कंपनीत काम करता येत नव्हते. त्यातच मोडकळीस आलेले जूने घर पावसात कोसळण्याची भीती होती. विराजवर एकापाठोपाठ एक अशी संकंटे आली होती यातून मदत मिळण्यासाठी त्याच्या दशावतार मित्रपरिवार सरसावला.
यासाठी चौके वावळ्याचे भरड येथे ३१ मे रोजी मदत निधीसाठी विनामूल्य नाट्यप्रयोग ठरला मात्र नियतीच्या मनात काही अघटित होते मंगळवार ३० मे रोजी विराजची आईचा मृत्यू झाला. तरीही ठरलेला नाट्यप्रयोग करून विराजला मदत करायची असे विराजच्या मित्रांनी ठरवले. ३१ रोजी नियोजित नाट्यप्रयोगावेळी नाट्यरसिक तसेच अनेक दानशूर व्यक्तींचे मदत करण्यासाठी हात पुढे सरसावले.. मदत निधी बॉक्स तसेच रोख रक्कम, आँनलाईन गुगलपे च्या माध्यमातून अवघ्या काही वेळातच तब्बल ३५०००/- रुपये जमले. या मदत निधीसाठी नाट्यरसिक, ग्रामस्थ व वावळ्याचे भरड भराडी कला क्रिडा विकास मंडळ सदस्यांची भरीव मदत मिळाली. सदर जमा झालेली आर्थिक रोख रक्कम मंडळाच्या जेष्ठ मंडळीच्या वतीने नाट्यप्रयोगाच्या शेवटी या नाटकातील कलाकर व या निधीसाठी संकल्पना अंमलात आणणारे सुहास माळकर , अजित परब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. सुहास माळकर यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनातून अजूनही रक्कम जमा होत आहे. लवकरच ही जमा रक्कम विराजच्या घरी जाऊन देण्यात येणार आहे असे माळकर यांनी सांगितले. यावेळी सर्व मदत निधी देणाऱ्यांचे आभार मानण्यात आला.











