सही केलेल्या चेकबुक सह महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग केली मुळ मालकास परत
कुडाळ (अमोल गोसावी) : काल रविवार दिनांक ४ जुन रोजी दुपारी ३:१५ च्या कुडाळ – शिवापूर या बस मध्ये वाहक सुनील रेवणकर व चालक श्री. अमोल प्रकाश परब यांना एका प्रवाशाची विसरून राहिलेली बॅग मिळाली होती. सदर मिळालेली प्रवासी बॅग तपासणी केली असता ती बॅग ज्ञानेश्वर जोशी, माणगाव आंबेरी गावधनेवाडी यांची असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा श्री. ज्ञानेश्वर जोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांना आज सकाळी कुडाळ बस स्थानकात बोलावून त्यांना चालक श्री अमोल प्रकाश परब , वाहक श्री सुनील रेवणकर, वाहतूक निरीक्षक श्री. आर. एल. राऊळ , वाहतूक निरीक्षक श्री विवेकानंद गावडे, श्री. एम. एन. अंबेसकर, वाहतूक नियंत्रक एस बी चव्हाण. श्री मसुरकर यांच्या उपस्थितीत परत करण्यात आली.
सदर बॅग मध्ये महत्वाची कागदपत्रे , औषधे, बँक पासबुक, सही केलेलं चेकबुक , इलेक्ट्रॉनिक किमती वस्तू, कपडे, व खाण्याचे सामान होते. ती बॅग ओळख पटवून मूळ मालक निता ज्ञानेश्वर जोशी आणि ज्ञानेश्वर विष्णू जोशी यांना परत करण्यात आली.आपले महत्वाचे सामान सुखरूप परत मिळाल्यामुळे श्री. ज्ञानेश्वर जोशी यांनी कुडाळ एस. टी. डेपो प्रशासन तसेच वाहक सुनिल रेवणकर आणि चालक अमोल परब यांचे आभार मानले.











