कुडाळ ( अमोल गोसावी ) : भाजपचे कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी यांनी आज आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे राजीनामा पत्र त्यांनी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना पाठवले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या अचानक राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. आपल्या राजीनामा पत्रात राकेश कांदे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी कुडाळ शहर अध्यक्षपदी कार्यरत होतो. सद्यस्थितीत माझ्या वैयक्तिक कामांमुळे मला सदर पदाला योग्य वेळ देता येत नाही. काही काळ मी स्वेच्छेने थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून यापुढे कार्यरत राहीन. माझे श्रद्धास्थान भाजपा नेते नारायण राणे, नीलम राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी मला सदैव प्रेम दिलेले आहे. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणे सदैव पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन त्याचबरोबर भाजपा नेते रवींद्र चव्हाण, कुडाळ तालुक्यातील त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टी यांनी मला शहराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करत असताना चांगली साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. माझ्या जागेवर पक्षाशी प्रत्येक वेळी प्रामाणिक राहणाऱ्या एका कार्यकर्त्याला संधी द्यावी ही विनम्रपूर्वक विनंती, काही चुकले असल्यास क्षमस्व. असे राकेश कांदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
भाजप कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांचा राजीनामा











