निराधार बांधवाच्या जख्मेतील ४४ किडे काढून केले प्रथमोपचार
खारेपाटण (प्रतिनिधी) : सांताक्रुजच्या वाकोला ब्रीजखाली दि.८ जुन, २०२३ ची नेहमीचीच गर्दीची सकाळ… वाकोला पुलावरून आणि पुलाखालून वेगाने जाणा-या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजात आणि माणसांच्या कोलाहलात कोणाचे कोणाला ऐकू येत नव्हते…
याच वाकोला पुलाखालच्या खांबाजवळ निराधार आणि वंचिततेचे जीवन जगत असलेले किसन सहानी (वय ४७) हे गृहस्थ त्यांच्या डाव्या पायाला झालेल्या गंभीर जख्मेने विव्हळत होते. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांचे त्यांचेकडे जेव्हा लक्ष वेधले गेले. तेव्हा ते पायाला झालेल्या गंभीर दुखापतीच्या व जख्मेत असंख्य किडे वळवळत असल्याच्या परिस्थीतीत आढळून आले.
सहानींच्या पायाची जखम सडल्यामुळे आणि त्यातील किड्यांमुळे सभोवतालच्या वातावरणात असह्य दुर्गंधी पसरली होती. त्यांच्या जवळून जायलाही कुणी धजावत नव्हते. अशात संदिप परब यांना ते निराधार व जख्मी स्थीतीत आढळल्यानंतर त्यांनी किसन सहानी यांची विचारपूस केली. व तात्काळ आवश्यक तजविज करून त्यांच्या जख्मेतील ४४ किडे काढून त्यांचेवर प्रथमोपचार केले. त्यांची दाढी करून – केस कापून त्यांना स्वच्छ करण्यात आले. चांगले कपडे देण्यात आले.
यावेळी जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते व सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरमधील राजा यादव, सचिन पडते, गोविंद मार्गी, संपदा सुर्वे व स्वयंसेवक अनिकेत भोईर हे उपस्थीत होते.
जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचितांना व दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबांसह पदपथावर जीवन कंठित असलेल्या माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी कार्यरत आहे.
संस्थेच्या मुंबईतील सांताक्रुज, दहिसर सह विरारफाटा जि.पालघर, कुडाळ जि.सिंधुदुर्ग मधील पणदूर,अणाव व किन्लोस सह गोवा राज्यातील ओपा खांडेपार व म्हापसे इ.ठिकाणी सुरू असलेल्या आश्रम, शेल्टर होम आणि डे केअर सेंटर्सद्वारे संस्थेचे कार्य सुरू आहे.















