सिंधुदुर्गातील हापूस आंबा पिकात ५३ % घट ; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन २०२२ च्या हंगामा पेक्षा सन २०२३ च्या हंगामामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे. डिसेंबर २०२२ मधील वातावरणातील बदलांमुळे आंबा मोहोराचे अत्यल्प प्रमाण तसेच फुल किडीचा मोठ्या प्रमाणातील प्रादुर्भाव हापूस आंब्याचे उत्पादन घटण्यास कारणीभूत ठरले आहे आमदार नितेश राणे यानी मार्च २०२३ च्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायत दारांचा हा ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडला होता व शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. तसेच दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा कृषि अधिक्षक, सिंधुदुर्ग याना नुकसानीची पाहणी करून शासनास अहवाल सादर करण्यास सूचित केले होते.
त्यानुसार जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी सिंधुदुर्ग यानी आंबा नुकसान भरपाईचा अहवाल तयार करून शासनास सादर केला आहे. या अहवालामध्ये सन २०२३ मध्ये हापूस आंबा उत्पादनामध्ये ५३% एवढी घट झाल्याचे आढळून आल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे भेट घेणार असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहेत.
विषय :- २०२३ सालच्या आंबा पीक नुकसानीचा पंचनामा करणेबाबत.
या वर्षीच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबा शेतकरी बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. १९६७ सालानंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती शेतकऱ्यासमोर आहे. आंबा मशागतीचा खर्च हा खूप मोठा असून तो करून बसल्यानंतर पिकच आलं नाही, अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. आंबा बागेतील ७०% कलमांना यावर्षी मोहरच आला नाही. त्यामुळे उत्पन्नाचा प्रश्नच नाही. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करून आपण प्रत्येक तालुक्याचा सविस्तर अहवाल तयार करावा. जेणेकरून आम्हाला आंबा पीक नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे करता येईल.
विषय- आंबा पिकाच्या उत्पादन स्थितीबाबत.
संदर्भ -१ आपलेकडील दि.२५/०४/२०२३ रोजीचे पत्र. विभागिय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे ४ यांना दि.१७/०५/२०२३ रोजी सादर करण्यात आलेला अहवाल.
३ विभागस्तरावरुन संचालक फलोत्पादन, कृ आ म रा पुणे ५ यांना सादर केलेला अहवाल
उपरोक्त संदर्भाधिन विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भ क्र. १ अन्वये सुचित केल्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील २०९ गावांमध्ये माहे मे २०२३ च्या पहिल्या पंधरावडयात क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत आंबा पिकांच्या उत्पादनस्थितीचे ८७९ शेतक-यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार आंबा पिकाची सन २०२२-२३ मधील उत्पादन स्थितीबाबतची सन २०२१-२२ वर्षाशी तुलना करुन माहिती सोबतच्या प्रपत्रात सहपत्रित करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात सर्वसाधारणपणे माहे डिसेंबर २०२२ च्या तिस-या आठवडयात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात झाली. वातावरणातील बदलामुळे मोहोर येण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्यातच फुलकिडीचे प्रमाण कमी असले तरी तुडतुडयाचे प्रमाण (प्रति मोहोरावर १० ते २० तुडतुडे) जास्त असल्याचे निदर्शनास आले. माहे मे २०२३ अखेरपर्यंत आंबा काढणी पुर्ण होणे शक्य आहे. प्रक्रिया उदयोगासाठी गतवर्षी (सन २०२१-२२ ) २४९०० मे. टन आंबा उपलब्ध झाला होता. तेच प्रमाण चालूवर्षी (सन २०२२-२३) १९९० मे. टन एवढाच आंबा उपलब्ध झाला आहे. याबाबतचा कोकण विभागचा सविस्तर अहवाल विभागिय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे ४ यांचेकडून संदर्भ क्र ३ अन्वये आयुक्तालय स्तरावर सादर करण्यात आला आहे.












