उपमुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांकडे मांडकुली ( कुडाळ ) येथील शेगले दाम्पत्याची मागणी
ओरोस (प्रतिनिधी): तौक्ते वादळात राहत्या घरावरील छप्पराचे पत्रे फुटले. ऐन पावसाळ्यात बेघर व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर द्या अथवा घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मिळणारी अनुदान रक्कम 20 हजार तरी द्या अशी मागणी कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावातील विजय गंगाराम शेगले आणि स्नेहांकिता विजय शेगले या दाम्पत्याने जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तनपुरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात शेगले यांनी म्हटले आहे की 2010 पासून आजवर आमचे कुटुंब उघड्या मांगर घरात राहत आहे. शासकीय घरकुल मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कुडाळ पं स गटविकास अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी आजवर 5 वेळा उपोषण केले आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात माजी खा निलेश राणे यांना निवेदन दिल्यानंतर 9 ऑक्टोबर 2019 चा कुडाळ गटविकास अधिकारी कार्यालायकडील गहाळ झालेला प्रस्ताव देण्यात आला. कुडाळ तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजन परब यांनी 23 मे 2023 रोजी जि.प.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून आपल्यासोबत आमची भेट घडवून आणली तेव्हा आपण 15 दिवसांत घर दुरुस्तीसाठी 20 हजार रुपयांचे शासकीय अनुदान देण्याचे मान्य केले होते. मात्र घरदुरुस्ती निधी घेतल्यानंतर नवीन घर प्रस्ताव मंजूर होणार नाही असे आपण सांगितलेत त्यामुळे घर दुरुस्तीसाठी चे 20 हजार रुपये आम्ही नाकारले. आजच्या उपोषणानुसार आमची मागणी आहे की 2021 मधील ( ड ) यादीतील नावावरून मला नवीन घरास मंजुरी मिळावी व ही मंजुरी मिळत नसल्यास तौक्ते वादळाने घराच्या छप्परावरील फुटलेले पत्रे घालण्यासाठी शासनाकडून 20 हजार रुपये मिळावेत.












