राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार
१२ ते २० वर्षांखालील विविध वयोगटांचा सहभाग
तळेरे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खेळाडू, पालक आणि क्रीडा शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना असून, मॅरेथॉन स्पर्धेची तारीख आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्यानंतर क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी क्रीडा संकुल, ओरोस येथे होणार आहेत.
या जिल्हास्तरीय स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दि. २५ किंवा २६ डिसेंबर २०२६ रोजी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहेत. राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रवास, निवास व भोजनाचा खर्च स्वतः करावा लागणार आहे.
स्पर्धेत पुरुष व महिला खुल्या गटासाठी १० किलोमीटर, २० वर्षांखालील मुलांसाठी ८ किलोमीटर व मुलींसाठी ६ किलोमीटर, १८ वर्षांखालील मुलांसाठी ६ किलोमीटर व मुलींसाठी ४ किलोमीटर, तर १६ वर्षांखालील मुले व मुलींसाठी प्रत्येकी २ किलोमीटर अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच १४ व १२ वर्षांखालील मुले व मुलींसाठी प्रत्येकी १ किलोमीटर अंतराची स्पर्धा होणार आहे.
२० वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २००७ ते २४ जानेवारी २००९, १८ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २००९ ते २४ जानेवारी २०११, १६ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २०११ ते २४ जानेवारी २०१३, १४ वर्षांखालील गटासाठी २५ जानेवारी २०१३ ते २४ जानेवारी २०१५, तर १२ वर्षांखालील गटासाठी २५
जानेवारी २०१५ ते २५ जानेवारी २०१७ या कालावधीत जन्म झालेला असणे आवश्यक आहे.
पुरुष, महिला आणि २० वर्षांखालील गटासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये, तर १८, १६, १४ व १२ वर्षांखालील गटांसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पुरुष, महिला, २०, १८ व १६ वर्षांखालील गटांतील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. १४ व १२ वर्षांखालील गटांच्या स्पर्धा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित राहणार असून, या गटांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा होणार नाहीत.
स्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाची लिंक लवकरच पाठविण्यात येणार असून, सर्व खेळाडू, पालक व क्रीडा शिक्षकांनी लिंक प्राप्त होताच अर्ज तातडीने व अचूक भरून पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.










