अपरिचित लेणी व कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी ‘लेणी संवाद’चा दौरा संपन्न

राजापूर ते देवगड दरम्यान एकूण ९ एकाश्म लेणी आणि ३ कातळ शिल्पांची केली पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणातील अपरिचित प्राचीन वारसास्थळांचा शोध, अभ्यास आणि त्यांची माहिती समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने ‘लेणी संवाद’चे कार्यकर्ते प्रफुल्ल पुरळकर यांनी ९ ते ११ नोव्हेंबर २०२६ दरम्यान कोकणातील राजापूर ते देवगड असा तीन दिवसीय अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी एकूण ९ एकाश्म लेणी व ३ कातळशिल्पे तसेच काही ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली.

राजापूर तालुक्यातील कोदवली,गोठणे-दोनिवडे आणि पांगरे बुद्रुक येथील आठ एकाश्म लेण्यांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी कोदवली व गोठणे-दोनिवडे येथील लेण्यांवर पत्रकार व संशोधक विनोद पवार, तर पांगरे बुद्रुक येथील लेण्यांवर प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी यापूर्वी संशोधन केले आहे. याशिवाय चुना कोळवण येथील सवतकडा धबधबा आणि कोदवली येथील सायबाचे धरण यांचीही पाहणी करण्यात आली.

तसेच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील एकाश्म लेणी तसेच पाळेकरवाडी,बापर्डे आणि पडेल येथील तीन कातळ शिल्पांची पाहणी यावेळी करण्यात आली. या स्थळांवर इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी संशोधन केले आहे. तसेच वाडा-गावठाण येथील टिपवणे परिसरातील जुन्या पाण्याच्या कुंडाची व अर्धवट कोरीव कामाचीही पाहणी यादरम्यान करण्यात आली.

या दौऱ्यासाठी गुरुनाथ सावंत, सूर्यकांत साळुंखे, विशाल साळुंखे, राज साळुंखे, सुशील मणचेकर, अमित पुरळकर, रणजित हिर्लेकर, विनोद पवार, प्रवीण पवार, दीपक सागवेकर, अनंत जानस्कार, प्रकाश जानस्कार आणि अक्षय गिजम यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. डॉ.अंजय धनावडे व मोडी लिपी आणि प्राचीन इतिहासाचे अभ्यासक अनिल दुधाने यांचे मार्गदर्शन मिळाले.

‘लेणी संवाद’ आणि ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह, महाराष्ट्र राज्य’ यांच्या माध्यमातून प्रफुल्ल पुरळकर महाराष्ट्रातील अपरिचित लेणी, कातळशिल्पे व दुर्लक्षित ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासाचे आणि माहिती संकलनाचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील पुरळ असून, सध्या ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. कोकणातील अशा दुर्लक्षित वारसास्थळांचा इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!