मुंबई (प्रतिनिधी): पार्ल्यात नुकताच मराठी व्यवसायिकांना एकत्र करून मराठी माणूस आणि व्यवसाय या विषयावर भव्य मेळावा आजोबा तर्फे आयोजित करण्यात आला. व्यवसायिकांचा आणि ज्यांना व्यवसायिक बनायचं आहे त्यांचा हा भव्य मेळावा अगदी दिमाखात साजरा झाला. अनेक मान्यवर आणि व्यवसायिक यांच्या उपस्थितीत खूप मोठ्या उत्साहात साजरा झाला. तळागाळातील मराठी माणूस काल व्यवसायाच्या प्रेरणेने झपाटून गेला होता. आजोबा या कोकणी उत्पादनाच्या शृंखलेचे संस्थापक संतोष जाधव यांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले त्याच बरोबर कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अजित पितळे यांनी ही मराठी माणूस आणि व्यवसाय या विषयावर आपले अमूल्य विचार प्रखर पणे मांडले.
मराठी माणूस व्यवसाय का करत नाही ? तो नेमका कोणत्या गोष्टीला घाबरतो ? त्यासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणत्या प्रकारची मानसिकता गरजेची आहे यावर सखोल आणि मार्मिक मार्गदर्शन संतोष जाधव यांनी केले. कोकणात कोण कोणत्या गोष्टीवर व्यवसाय करू शकतो याबद्दल सुंदर माहिती श्री अजित पितळे यांनी दिली. सर्वच स्तरावरून या मेळाव्याचे कौतुक होत आहे. माजी नगरसेवक सुहास तावडे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मराठी माणसाला व्यवसायात कसे आणता येईल यासाठी असेच व्यवसाय मेळावे पुढे भरविण्याचा आजोबा आणि कोकण कट्टा या दोन्ही संस्थेचा मानस आहे.