ग्रामसेवक म्हणून बजावलेले कर्तव्य निश्चितच सर्वांसाठी आदर्शवादी आहे
वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रत्येक कामात सचोटी आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. हे ज्याने जाणले आणि त्याप्रमाणे जीवनात कृती केली की तो माणुस कधीही मागे राहत नाही. त्याला त्याच्या जीवनात नेहमीच यश मिळते,लोकांचे आशीर्वाद मिळतात.खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचे जीवन सार्थकी लागते. हेच तत्व अंगिकारत सेवाभावी वृत्तीने खांबाळे गावासह वैभववाडी तालुक्यातील इतर गावामध्ये 11 वर्षे ग्रामविकासात भरीव कामगिरी करून आपल्या कामाचा आणि कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवनारे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आदर्श ग्रामसेवक उमेश राठोड हे निश्चितच आदर्शवादी ग्रामसेवक राहीले आहेत. असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी काढले.
खांबाळे गावामध्ये ग्रामसेवक म्हणून सेवा बजावलेले उमेश राठोड आणि वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन चट्टे यांची जिल्हा बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ खांबाळे ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाला.यावेळी मंगेश लोके, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रामसेवक राठोड म्हणाले की,खांबाळे गावातील सर्वच ग्रामस्थ यांनी गावात विकासात्मक दृष्टीने चांगले सहकार्य केले.आपण सर्व ग्रामस्थांनी भरपूर प्रेम, आपुलकी दिलात माझ्यावर विश्वास ठेवलात हे मी कधीच विसरु शकणार नाही.वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन चट्टे यांनी सुध्दा खांबाळे गावात साडे पाच वर्षाच्या कालावधी वायरमन म्हणून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, ग्रामसेविका वर्षा राठोड, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता कदम, अमोल चव्हाण, माजी सरपंच विठोबा सुतार,जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार, दीपक पवार,सोसायटी सचिव सिद्धेश रावराणे,दत्तात्रय परब,गणेश सदाशिव पवार,मंगेश कांबळे, प्रभाकर पाताडे, दिनेश पालकर, विलास मोहिते,नळ कर्मचारी अंबाजी पवार, ग्रा.पं. शिपाई नंदू सदानंद पवार, जयेश पवार आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.