बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहा. गटविकास अधिकारी यशवंत गवस व कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर यांच्या उपस्थितीत ही निवडण प्रक्रिया पार पडली.
पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड तब्बल ४ वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर पार पडली. भाजप ६, शिवसेना ६, अपक्ष ५ व उबाठा शिवसेना १ असं बलाबल होत. सभापती पद आरक्षित असल्याने शिवसेनेच्या वाट्याला ही जागा सुटली. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील पं.स. सदस्या शिवसेनेच्या सुस्मिता जाधव सभापती पदी बिनविरोध निवडून आल्या. तर उपसभापती पदी याच मतदारसंघातील भाजपचे पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक बिनविरोध ठरले. सभापती व उपसभापती पदासाठी केवळ एक- एक अर्जच दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पाटील यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे पंचायत समिती सावंतवाडीला २४ वा सभापती तर ९ व्या महिला सभापती मिळाल्या आहेत. महायुतीचा झेंडा पंचायत समितीवर फडकला असून नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी यावेळी पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, अवनी राऊळ, प्रणाली टिळवे, प्राजक्ता केळुसकर, मायकल डिसोजा, प्रशांत सुकी, सदाशिव राणे, महेश धुरी, धनश्री मराठे, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, नेहा कांबळी, जितेंद्र गांवकर, उत्कर्षा गांवकर, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई आदी उपस्थित होते.
बांदा सभापती पदाच्या कार्यकाळात पंचायत समितीची मंजूर इमारत पूर्णत्वास आणणार तसेच विधायक काम करणार अशी ग्वाही नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी दिली. तर शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील असं मत उपसभापती गौरव मुळीक यांनी व्यक्त केले. सभापती उपसभापती निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सभापती सुस्मिता जाधव म्हणाल्या, मला संधी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानते. सभापती पदाच्या या कार्यकाळात जनहिताची काम करण्यावर आपला भर राहील. तसेच प्रशासनाची होणारी गैरसोय बघता मंजूर इमारत माझा कार्यकाळ संपण्यापूर्वी पुर्णत्वास आणू असा विश्वास व्यक्त केला. तर, उपसभापती श्री. मुळीक म्हणाले, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर यांना अभिप्रेत काम आम्ही करणार आहोत. मला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना मला संधी दिली. हे केवळ भाजपातच होऊ शकत. पुढच्या चार महिन्यांत तुम्हाला चांगला कारभार दिसून येईल तसेच पहिल्या बैठकीत इमारतीचा विषय आम्ही घेणार आहोत अशी माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











