सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवानिवृत्तीला जवळपास वर्ष पूर्ण होत आले तरी शासनाकडून सेवानिवृत्तीपर लाभ मिळाले नसल्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रघुनाथ दत्तात्रय बोभाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
बोभाटे हे ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्तीनंतर मिळणारे गटविमा, भविष्य निर्वाह निधी व इतर सेवानिवृत्तीपर लाभ अद्याप मिळाले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या सर्व मिळून सुमारे २४ लाख रुपये शासनाकडे प्रलंबित असून ही रक्कम व्याजासह देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
सेवानिवृत्तीच्या वेळी सुमारे ९० हजार रुपये तोळा दराने सोने होते. त्या वेळी पैसे मिळाले असते तर कुटुंबासाठी सोने खरेदी करता आले असते; मात्र आता सोन्याचा भाव वाढल्याने ते परवडणार नाही, असेही बोभाटे यांनी सांगितले.दरम्यान प्रशासनाकडून २०२४ पासून संबंधित अनुदान उपलब्ध झाले नसल्याने रक्कम देण्यात अडचण येत असल्याचे सांगितले जात असल्याचा दावा बोभाटे यांनी केला.
या उपोषणाला महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेचा पाठिंबा आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर, सचिव नितीन जठार, राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण, धोंडू रेडकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
५० कोटी अनुदान प्राप्त
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना मिळणारे उत्पादन व औषधांना दीर्घकाळ प्रलंबित होते हे प्रलंबित लाभाचे अनुदान मिळावे यासाठी शिक्षक संचालक पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर शिक्षण विभागाच्या पाठपुराव्यास यश आले असून शिक्षक संचालक पुणे यांच्याकडून सुमारे ५० कोटी रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. हे अनुदान लवकरच वितरित करण्यात येईल –शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,











