धामापूर तलाव ते मळा ओढ्यातील गाळ उपसा केल्यामुळे भातशेतीचे नुकसान टळणार

धामापूर सरपंच मानसी महेश परब , उपसरपंच रमेश निवतकर यांच्या पाठपुराव्याला यश

चौके ( अमोल गोसावी ) : धामापूर सरपंच मानसी महेश परब , उपसरपंच रमेश निवतकर , प्रशांत गावडे व इतर सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी १५ जून रोजी लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्या हस्ते शुभारंभ करून धामापूर ल. पा. तलावाच्या धरण सांडवा व धरण कालवा देखभाल दुरुस्ती अंतर्गत धामापूर ओढ्यामधील गाळ काढण्यात आला. या कामाचा धामापूर गावातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पावसाळ्यात धरणाचे सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी धामापूर येथील ओढ्यामधून कर्लीच्या खाडी पात्रात मिळते, परंतू गेली अनेक वर्षे ओढ्यातील मधील गाळ काढला नसल्यामुळे ओढ्याच्या आजूबाजूच्या शेतात पावसाळी कालावधी मध्ये पाणी शिरत असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आले आहे, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेती करणे शक्य होत नसे व १०० हेक्टर पेक्षा अधिक जमीन शेती वाचून वंचित होती परंतू ग्रामपंचायत धामापूर व पाटबंधारे विभाग आंबडपाल यांच्या नियोजना मुळे धामापूर ओढ्या मधील गाळ काढण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे व पुन्हा धामापूर येथील जमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता रमेश जोशी यांच्या देखरेखीखाली व धामापूर सरपंच सौ. मानसी महेश परब , उपसरपंच रमेश निवतकर , कृषितज्ञ प्रा. महेश धामापूरकर , सामाजिक कार्यकर्ते महेश परब , ग्रा. सदस्य प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, तेजस्विनी भोसले, स्थानिक शेतकरी विश्वनाथ परब, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, पुंडलिक मेस्त्री, विशाखा परब , व शेतकरी यांच्या उपस्थितीत धामापूर तलावापासून ते धामापूर मळ्यापर्यंत येणाऱ्या ओढ्यातील गाळ साफ करण्यात आला. धामापूर ग्रामपंचायतच्या गाळ साफ करण्याच्या मागणीची तत्परतेने दखल घेऊन मुख्य कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी सदर काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण करून दिल्याबद्दल धामापूर सरपंच व सदस्य , यांनी श्रीमंगले यांचे आभार व्यक्त केले. तसेच सरपंच सौ. मानसी महेश परब यांनी दुरदृष्टी ठेवून पावसाळ्यापुर्वी नाल्यातील गाळ साफ करून घेत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळल्याबद्दल गावातील शेतकऱ्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!