जि. प. प्राथमिक शाळा काळसे – धामापूर शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाले नविन शौचालय

ग्रा. प. सदस्य चंद्रकांत राऊळ यांच्या प्रयत्नांना यश

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील काळसे माळकेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळा काळसे – धामापूर च्या नविन शौचालयाचे आज ग्रामसेवक पी. आर. निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत ( पप्या ) राऊळ , मोनिका म्हापणकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वप्नाली गोसावी , उपाध्यक्ष दिनेश काळसेकर , मुख्याध्यापिका सौ. सुकन्या गंगावणे , अंगणवाडी सेविका उर्मिला परब ,मनाली चुडनाईक , सुप्रिया घाडी, साक्षी पाटील , आणि विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेसाठी असलेल्या जुन्या शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली होती. छप्पर फुटून आजूबाजूला झाडी वाढली होती त्यामुळे त्याठिकाणी सरपटणाऱ्या जनावरांचा वावर वाढला होता. यामुळे छोटे विद्यार्थी त्या शौचालयात जाण्यास घाबरत होते. म्हणून काळसे धामापूर प्राथमिक शाळेच्या सदर शौचालयाची दुरुस्ती अथवा नवीन शौचालय व्हावे यासाठी गेली दोन वर्षे पालक आणि शिक्षकांची मागणी होती. काळसे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य चंद्रकांत राऊळ यांना शालेय विद्यार्थ्यांची ही समस्या समजताच त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून नविन शौचालयासाठी निधी मंजूर करून आणला आणि अवघ्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे शौचालय बांधून पूर्ण केले. विशेष म्हणजे दोन वर्षे प्रलंबित असलेली मागणी दोन महिन्यात पूर्ण करण्याचे काम सदस्य राऊळ यांनी करून दाखवले. या कामात त्यांना ग्रामसेवक पी. आर . निकम यांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रशालेत येणाऱ्या विद्यार्थी , विद्यार्थीनींची होणारी गैरसोय दूर करून शौचालय बांधून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वप्नाली गोसावी व मुख्याध्यापिका सौ. गंगावणे यांनी सदस्य चंद्रकांत राऊळ आणि ग्रामसेवक पी. आर. निकम यांचे विद्यार्थी पालकांच्या वतीने आभार मानले.

error: Content is protected !!