कुडाळ – मालवण रोड वरील वाहतूक बंद होण्याची शक्यता.
नेरुर सरपंच भक्ती घाडी , ठाकरे सेनेचे रूपेश पावसकर , शेखर गावडे घटनास्थळी दाखल.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत व्यक्त केली नाराजी.
कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ नेरुरपार मालवण या मुख्य रस्त्यावरील नेरुर जकातनाका ते नागदा मारुती मंदिर दरम्यान नेरुर कलमेवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाचा काही भाग काल शुक्रवारी रात्री अतिवृष्टीमुळे ढासळला असून सुमारे १० ते १५ फूट लांबीचा कॉंक्रीटचा संरक्षक कठडा पूर्णपणे कोसळून पुल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे कुडाळ मालवण रोडवरील अवजड वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान आज सकाळी नेरुर सरपंच भक्ती घाडी , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ओबीसी जिल्हाप्रमुख श्री. रुपेश पावसकर , विभागप्रमुख शेखर गावडे , शाखाप्रमुख बाळा पावसकर , माजी उपसरपंच समद मुजावर , राजन पावसकर , अजित मार्गी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर दुर्घटनेची माहिती दिली. व या मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करून ढासळलेल्या पुलाची डागडुजी लगेच करण्याची मागणी केली. संबंधित विभागाचे कर्मचारी अथवा अधिकारी दुपारपर्यंत याठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी सांगितले कि, या पुरातन पुलाची डागडुजी झाली होती परंतु या मुसळधार पावसात ते एका बाजूने खचून आता कुडाळ मालवण हा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही संबंधित शासकीय यंतणेशी दूरध्वनी वरुन माहिती दिली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित नसल्याने लोकांना निर्माण झालेला धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून आम्हालाच हा रस्ता बंद करावा लागेल, त्यामुळे याची दखल शासनाने घ्यावी आणि या मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करावी” अशी मागणी श्री पावसकर यांनी केली आहे.











