खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणात गेली ५/६ दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे खाडी लगतच्या गावामध्ये भातशेती मध्ये पुराचे पाणी शिरले असून खारेपाटण येथील शुकनदिने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण गावात घुसले आहे.सद्या पडत असलेला पाऊस असाच पडत राहिल्यास नदीची पाण्याची पातळी वाढून खारेपाटण शहरात व बाजारपेठेत पुराचे पाणी कधीही घुसण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोरदार मुसळधार पाऊस पडत असून खारेपाटण मध्ये सुधा पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे.मात्र पूर येण्याची शक्यता कमी होती कारण नुकताच मे महिन्यामध्ये शुक नदीतील गाळ काढण्यात आला होता. परंतु जोरदार होत असलेल्या पर्जन्य वृष्टी मुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. खारेपाटण मध्ये दुपारी १२.०० वाजता पुराचे पाणी खारेपाटण मध्ये भरण्यास सुरवात झाली शनिवार आठवडा बाजार असल्यामुळे बाजारात गर्दी होती.मात्र खारेपाटण मध्ये पुराचे पाणी भरू लागताच ग्राहक व व्यापारी यांची एकच धांदल उडाली.
दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे खारेपाटण – चिंचवली मार्ग बंद होतो.यावेळी मात्र या रस्त्यावर मोठा वहाळ असणाऱ्या कोंडवाडी येथे नुकतीच रस्त्याची उंची वाढवल्यामुळे वाहतूक सुरू आहे .तर खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे देखील रस्त्याची उंची वाढवली असल्यामुळे शुक नदीच्या पुराच्या पाण्यामुळे हा रस्ता बंद झालेला नाही. तसेच खारेपाटण भाटले व बिगे येथील शेत जमिनीत पुराचे पाणी गेले असून खारेपाटण येथील सिंधूदुर्ग जिल्हा बँकेच्या इमारतीच्या तळमजल्यावर पुराचे पाणी गेले आहे.














