अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरीं च्या युक्तिवादामुळे आरोपी तेवतीयाच्या जेलमुक्कामात वाढ
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): धावत्या रेल्वेतून पीडित युवतीला ढकलून देऊन नंतर जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर पडलेल्या पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधम अरुण छोटूराम तेवतीया ( रा.कोंडल, हरियाणा ) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी नामंजूर केला. अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी आरोपी तेवतीया च्या जामीन अर्जाला हरकत घेत केलेल्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपी अरुण तेवतीया चा जेल मुक्काम आणखी वाढला आहे. आरोपी तेवतीया याने 22 एप्रिल 2023 रोजी एर्नाकुलम पुणे ट्रेनमध्ये दिव्यांगांच्या डब्यातून कणकवली हून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असलेल्या फिर्यादी पीडित युवतीला धावत्या रेल्वेतून खाली ढकलून दिले होते. त्यानंतर आरोपी ने रेल्वे ची चेन खेचून रेल्वे थांबल्यावर पीडित युवती जखमी अवस्थेत रेल्वे रुळानजीक पडलेल्या ठिकाणी चालत येऊन तिच्यावर बळजबरी जे बलात्कार केल्याची फिर्याद पीडित युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपी अरुण तेवतीयाला 23 एप्रिल रोजी कणकवली पोलिसांनी अटक केली होती. 27 एप्रिलपासून आरोपी तेवतीया न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जिल्हा न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आरोपी हा परराज्यातील असून जामिनावर सुटल्यास पुन्हा न्यायालयीन सुमावणीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी आहे, आरोपी पीडितेच्या मागोमाग रेल्वेच्या दिव्यांग डब्यात चढतानाचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे, रेल्वे डब्यात आरोपीने युवतीचा विनयभंग केला, पीडिता मदतीसाठी डब्याच्या दरवाज्यात जाऊन आरडाओरडा करत असताना आरोपीने तिला धावत्या रेल्वेतून जीवे मारण्याच्या उद्देशाने धक्का देत खाली ढकलले, पीडिता पडलेल्या ठिकाणी जात असताना आरोपी ला रेल्वे गार्ड ठाकरे याने पाहिले असून ओळख परेड मध्ये आरोपीला ओळखले आहे, आरोपीने जखमी अवस्थेतील पीडितेवर लैंगिक अत्याचार केला असून आरोपीच्या शर्टाला पीडितेच्या रक्ताचे डाग लागलेला शर्ट जप्त करण्यात आला आहे, पीडिता ही शिक्षण घेत असून आरोपी ला जामीन मिळाल्यास तो फिर्यादी पीडितेच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. अभियोक्ता तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी अरुण तेवतीया याचा जामीन अर्ज फेटाळला.













