अपघातातील पोलीस कारचालक अल्कोहोल च्या नशेखाली असल्याचा केला दावा
अपघातग्रस्त कार ची पियुसी सर्टिफिकेटची मुदतही संपलेली असल्याकडे वेधले लक्ष
कणकवली (प्रतिनिधी): कुडाळ पिंगुळी गुढिपूर येथे झालेल्या अपघातात बोर्डवे येथील युवक विराज तेली यांचे अपघातात निधन झाले. त्याला ला न्याय द्या, व पोलीस तपास योग्य पध्दतीने करा अशी मागणी बोर्डवे ग्रामस्थां सह शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदन देत केली. यावेळी मृत विराज चे वडील निलेश तेली, कणकवली पं स चे माजी उप सभापती मिलिंद मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधीये,बोर्डवे उपसरपंच सचीन साळवी,माजी सरपंच राजू मोडक, माजी सरपंच गजानन शिंदे, माजी उप सरपंच आसिफ शेख,ग्रा पं सदस्य अक्षय शिंदे, महेश मोडक, यदुनाथ तेली,प्रदीप पालव,महादेव खांदारे,प्रवीण तेली,भाई तेली उपस्थित होते. विराज याच्या वडिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विराज तेली हा रविवारी सायकलींग करण्यासाठी गेला असता त्याचा मित्र विरेंद्र प्रविण गावडे हा सोबत असताना मुंबई-गोवा हायवेवर रस्ता क्रॉस करण्याकरीता त्या दुभाजकावर थांबलेला असताना चारचाकी गाडीने मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने घिसाडघाईने येवून त्याचा नियोजीत मार्ग (फस्ट लेन) सोडून दुभाजकावर उभा असलेला माझा मुलगा विराज तेली याच्या वर येवून आदळली. व त्या कारणामुळे विराज याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात संबंधित चालकाच्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे झालेला आहे. सदरच्या अपघातामुळे निष्पाप विराज यास त्याचे प्राणापासून मुकावे लागून त्याचा बळी गेलेला आहे. या गोष्टीचा गंभीर विचार होवून संशयित आरोपीवर जास्तीत जास्त शिक्षा होणेकरीता कारवाई होणे आवश्यक आहे. सदर संशयित आरोपी हा मयतास ठाकून आपले वाहन तिथे न थांबवता मुंबईच्या दिशेने पळून जात असताना त्याचा पाठलाग मागून येणा-या अज्ञात मोटर सायकल केला व त्याला झालेल्या अपघाताची जाणीव करुन दिली. सदरच्या इसमाने त्याला जाणिव करुन देवून त्या इसमाने त्यांना परत घटनास्थळी आणून मयत हे रक्तबंबाळ स्थितीत पडलेले होते.तेथील जमाव व आक्रोश बघून भितीने त्याने आपल्या चारचाकीत घालून त्याला उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात आणलेले होते. सदरची घटनेबाबत वरील मजकूर अनवधानाने मला घटनेच्या वेळी माझी मानसिक स्थिती स्थिर नसल्याने व दुखा:त असल्याने मला सांगता येत नव्हता. सबब माझे या गुन्हयाशी अतिरीक्त अथवा पुरवणी जबाब वरील प्रमाणे आहे. त्याचा सदर तपासकामी नव्याने पुरवणी जबाब नोंदविणे अत्यावश्यक आहे. सदर चारचाकी गाडीचे ऑनलाईन ऍपव्दारे तपासणी केली असता सदर गाडीचे पोल्युशन प्रमाणपत्राची मुदत दिनांक १९/१०/२०२२ रोजी संपलेली आहे. सबब महाराष्ट्र मोटर वाहन कायदा कलम १९० (२) अंतर्गत आरोपी यांना जास्तीत जास्त दंड होण्याकरीता वाढीव कलमे नोंदविणे आवश्यक आहे.
तसेच तपासिक अंमलदार यांनी घटनास्थळाची वस्तुस्थिती लपवून चुकीच्या पध्दतीने पंचनामा केलेला आहे. तरी सदरचा पंचनाम्याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. तरी योग्य वस्तुस्थितीदर्शक पंचनामा होणे आवश्यक आहे.सदरच्या तपासकामी फिर्यादी याचे नाव सुध्दा घाईगडबडीत चुकीचे लिहीलेले आहे. तसेच सदर आरोपी हे अल्कोहोलच्या अंमलाखाली होते याकडे सुध्दा लक्ष दिलेले नाही. त्यामुळे सदर गुन्ह्यात गुन्हयातील कलमे नोंदवून आरोपी याला कठोर शिक्षा मिळण्याच्या हेतूने तपासकाम करण्याचे तपासिक अंमलदार केसरकर यांना आदेश देण्यात यावेत. अशी मागणी या निवेदना द्वारे केली आहे.













