वैभववाडी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विद्यार्थी व पालक सहभागी होणार
वैभववाडी (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरू झाल्या पासून गेली तीन महिने उलटून गेले तरी अद्याप शालेय विद्यार्थ्यांच्या एस टी बस चे वेळापत्रक कोलमडले पाहायला मिळत आहे. परिणामी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे एस टी बस च्या वेळा व प्रशालेच्या अधिवेशनच्या वेळा यामध्ये बराच फरक असल्याने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दररोज शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वैभववाडी तालुक्यात मानव विकास अंतर्गत विद्यार्थांना एस.टी.बस ची सुविधा उपलब्ध असताना देखील संबंधित विभागाच्या एस.टी.बस चा अल्प पुरवठा वैभववाडी तालुक्यात दिसत आहे .अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाने विभाग नियंत्रक राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभाग कणकवली आगार व्यवस्थापक कणकवली यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार तसेच समक्ष तसेच फोन द्वारे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे होणारी गैरसोय सांगितली आहे तरी देखील त्या पत्रांना संबंधित विभागाने केराची टोपली दाखवलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानी बद्दल पालक व विद्यार्थ्यांनी अखेर आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे विद्यार्थी तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी वैभववाडी तालुका पंचक्रोशीतील विद्यार्थी , पालक प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एस.टी. महामंडळाच्या या गलथान कारभारा विरोधात वैभववाडी बस स्थानकावर रास्ता रोको करणार आहेत.












