तेंडोलीत ठाकरे गट-काँग्रेसला खिंडार, अनेक कार्यकर्ते भाजपात

कुडाळ ( अमोल गोसावी ) : तेंडोली गावातील सर्व विकासकामे भाजप पूर्णत्वास लावेल, अशी ग्वाही भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी तेंडोली येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात दिली. शुक्रवारी संध्याकाळी तेंडोली येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे शिवसेना कार्यकर्ते तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे रामचंद्र राऊळ यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी भाजप प्रदेश सदस्य (महाराष्ट्र) दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते का. स. नाईक गुरुजी, भाजप प्रदेश सदस्य (महाराष्ट्र) बंड्या सावंत, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजप जेष्ठ पदाधिकारी राजू राऊळ, रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, विजय कांबळी, भाऊ पोतकर, माधवी प्रभू, दाजी गोलम, प्रसाद गावडे, तन्मय वालावलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्ता सामंत म्हणाले की, भाजप नेते निलेश राणे यांना कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार म्हणून जिंकून द्यावयाचेच आहे. यासाठी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. तालुक्यातील तेंडोली मतदारसंघातून भाजपला अधिकाधिक मताधिक्य मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. तेंडोली गावातील अनेक रखडलेली विकासकामे भाजपच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दत्ता सामंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

भाजपची कार्यकर्ते शब्द पाळणारे: दत्ता सामंत

भाजप कार्यकर्ते शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे तेंडोली गावातील रखडलेली विकासकामे पूर्ण केली जातील. रामचंद्र राऊळ यांनी तेंडोली गावच्या समस्या आमच्यापर्यंत मांडल्या असून येथील स्टेजचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दत्ता सामंत यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

गणपतीपर्यंत कुडाळ – मालवणमध्ये भाजपमध्ये मोठे प्रवेश

गणपतीपर्यंत भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार असल्याचे दत्ता सामंत यावेळी सांगितले. वैभव नाईक यांचा पराभव निश्चित असून त्यामुळे ते हतबल झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सर्वसामान्य वर्गासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा नागरिकांनी फायदा घ्यावा असेही ते म्हणाले. येथील स्थानिक आमदार आणि खासदारांनी केवळ दौरे केले. पण विकासकामांकडे दुर्लक्ष केले, अशी टीका सुद्धा दत्ता सामंत यांनी यावेळी केली. आपण सर्वांनी भाजपच्या पाठीशी राहा, आम्हाला साथ द्या, विकास भाजपच करेल, असे प्रतिपादन दत्ता सामंत यांनी केले.
यावेळी भाजप उपाध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून विकासकामे मोठ्या प्रमाणात होत असून तेंडोली मतदारसंघ मात्र दुर्लक्षित राहिला. येथील विद्यमान आमदार- खासदारांनी झालेल्या कामांचे श्रेय घेतले आहे. पण जी कामे आता होत आहेत ती भाजपकडून होत आहेत. काम झाले की येथील आमदार-खासदार फोटो काढण्यासाठी जातात. हे सत्तेत नाहीत आणि निधी नसताना मात्र कामे कशी होतात हा प्रश्न रणजीत देसाई यांनी आमदार- खासदार यांना टोला लगावत उपस्थित केला.

ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते का. स. नाईक गुरुजी म्हणाले की, १९८५ पासून मी भाजपचा कार्यकर्ता असून त्यावेळची आणि आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे. आता भाजपमध्ये कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य घटक आहे. कार्यकर्ता असेल तरच पक्ष चालतो. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा असे ते म्हणाले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर म्हणाले की, रामचंद्र राऊळ यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांचे आपण भाजपकडून स्वागत करतो. मोदी सरकारने मागील ९ वर्षात सर्वोत्तम काम केले असून सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मोदींच्या काळात देशाची उत्तम प्रगती होत असून देश मजबूत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक असून हा पक्ष आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलातर ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल म्हणाले की, आजच्या भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात अनेक प्रवेश होत असून ही एक आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काळात भाजपचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर फडकविणार आहोत. आपण विजयश्री खेचून काढू, असेही ते म्हणाले. येथील स्थानिक आमदार-खासदारांनी केवळ दिखाऊपणा केला असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!