मालवण – कुडाळचा पुढील आमदार भाजपचाच
भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी यांचा (उ.बा.ठा.) गटाचे हरी खोबरेकर यांच्यावर पलटवार
मसुरे (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मालवण तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काम करावे असा सणसणीत टोला भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हाणला आहे.
शिवसेना उद्धव गटाच्या मालवण तालुका अध्यक्ष खोबरेकर यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला श्री गोसावी यानी उत्तर दिले आहे.माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे खोबरेकरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच खोबरेकर सैरभर झाले असावेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चिंता करू नये. 2024 ला भाजपचा आमदार निवडून येणार आणि भाजपच गुलाब उधळणार यात मात्र शंका नाही असा पलटवार गोसावी यांनी खोबरेकरांवर केला आहे. मालवण कुडाळ मध्ये विकास झाला असे खोबरेकर म्हणाले, मग या विधानसभा मतदारसंघातील धनगर वस्त्या अजून विकसित का झाल्या नाहीत? अजूनही त्यांच्या वाडी वस्तीवर रस्ते पोचले नाही आहेत. निधना नंतर स्मशानभूमी देखील काही ठिकाणी नाही आहे. अजून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. मागील साडेसात वर्ष सत्तेतील आमदार असून सुद्धा मालवण तालुक्याचा विकास करण्यास उबाठा गटाचे आमदार निष्क्रिय ठरलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणाने यावेळी अमुलाग्र बदल होऊन भाजपचाच आमदार निवडून येईल. त्यामुळे शिवसेना उद्धव गटाच्या तालुका अध्यक्षांनी आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे. भाजपमध्ये काय चाललय त्या ठिकाणी डोकावून पाहू नये. पुन्हा आमच्या नेत्यांवरती टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशाराही बाळा गोसावी यांनी खोबरेकरांना दिला आहे.










