अन्यथा शिवसेना उबाठा करणार जनआंदोलन ; मंगेश लोके यांचा इशारा
डांबरीकरण चा एक लेअर पूर्ण, उर्वरित दोन लेअर पावसाळ्यानंतर
उपअभियंता जोशी यांची माहिती
वैभववाडी (प्रतिनिधी): खारेपाटण तिथवली भुईबावडा गगनबावडा या राज्यमार्गावर 5 किमी लांबीचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण चे काम मे 2023 मध्ये करण्यात आले. सदर काम निकृष्ट असल्यामुळे पहिल्याच पावसात अवघ्या 3 महिन्यात हा रस्ता उखडून गेला असून खड्डेमय झाला आहे. 3 कोटी 48 लाख निधी या कामासाठी मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने निकृष्ट काम केले असून त्याला पिडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप शिवसेना उबाठा वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केला असून संबंधित निकृष्ट काम ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने करून घेतल्याशिवाय कामाचे देयक ठेकेदाराला देण्यात येऊ नये अशी मागणी कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. ठेकेदाराला नव्याने काम केल्याशिवाय देयक दिल्यास शिवसेना उबाठा च्या वतीने जनआंदोलन छेडत रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा लोके यांनी दिला आहे.दरम्यान याबाबत वैभववाडी विभागाचे उपअभियंता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रस्ता हा यापूर्वी साडेतीन मीटर रुंद होता. सदर रस्त्याचे याचवर्षी साडेपाच मीटर रुंदीकरण चा प्रस्ताव मंजूर झाल्यानुसार रस्ता रुंदीकरण करण्यात आले. मात्र मागील कित्येक वर्षे या रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था होती.खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवणे वाहनचालकांना जिकिरीचे होत होते.वाहनचालक तसेच जनतेला पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागू नये म्हणून ठेकेदाराकडून मंजूर कामातील डांबरीकरण चा एक लेअर चे काम करून घेण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर उर्वरीत दोन लेअर डांबरीकरण करून दर्जेदार रस्ता बनवला जाईल.तूर्तास रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे ठेकेदाराचे देयक देण्यात आलेले नाही.











