उदय सामंत, किरण सामंत किंवा दीपक केसरकर खासदारकी चे उमेदवार
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची मोठी घोषणा
मी आमदार व्हावे ही कार्यकर्त्यांची भावना
कणकवली (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर अथवा किरण सामंत हे शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार असतील.रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा शिवसेनेचाच असणार अशी मोठी घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा.श्रीकांत शिंदे आणि लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आ रवींद्र फाटक येत्या 9 सप्टेंबर रोजी रत्नागिरी – सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यावेळी लोकसभा उमेदवारी बाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही आग्रे म्हणाले. आज माझ्या वाढदिवसानिमित्त भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचे पालन केले जाईल. जिल्ह्यात 3 मतदारसंघ असून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास त्यानुसार मतदारसंघात विधानसभा लढवेन असे आग्रे म्हणाले.यावेळी विधानसभा संघटक संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, प्रशांत वनस्कर आदी उपस्थित होते.












