देवगड (प्रतिनिधी): किंजवडे ते दहीबाव आयनलपूल मधलीवाडी येथील रस्त्यावर दि. ०९/११/२०२० रोजी ३.४५ चे सुमारास डंपर पलटी होवून डंपर मध्ये बसलेले पाच मंजूर खाली पडून त्यांचे अंगावर चिरे पडून दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी व तिघांच्या गंभीर दुखापत प्रकरणी डंपर चालक विनय विजय मयेकर याची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी. घाडगे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी आरोपीचे वतीने अँड. कौस्तुभ मराठे यांनी युक्तीवाद केला. अधिक माहिती अशी कि, दि. ०९/११/२०२० रोजी ३.४५ चे सुमारास संशयित आरोपी चालक हा त्याचे ताब्यातील डंपर किंजवडे ते दहिबाव आयनलपूल मधलीवाडी येथील रस्त्यावर चालवत असताना अतिवेगाने चालवल्याने सदरचा डंपर पलटी होवून डंपर मध्ये बसलेले पाच मजूर खाली पडले होते. सदर सर्व मजूरांच्या अंगावर चिरे पडले होते. त्यातील मुरगाप्पा कोटरकी यास गंभीर दुखापत होवून जागीच मयत झाला. तसेच परशुराम चलवादी हा देखील औषधोपचार चालू असताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मयत झाला होता. तर डंपरमधील इतर तीन कामगार गंभीर जखमी झाले होते. याकामी देवगड पोलीसांनी डंपर चालक विनय विजय मयेकर याचेवर भा.दं.वि. कलम ३०४अ, २७९, ३३७, ३३८, मो.वा.कायदा १८४, १४६ / १९६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता, तथापि साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती, उलटतपासा दरम्यान घटना शाबित न होणे या सर्व मुद्दयांच्या आधारे आरोपीची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. बी. घाडगे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
मजूरांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाची निर्दोष मुक्तता












