कोल्हापूर चा बँक कर्मचारी कणकवली उड्डाणपूला नजीक आढळला बेवारस स्थितीत

संदिप परब यांच्या संविता आश्रमाने दिला मायेचा आधार

खारेपाटण (प्रतिनिधी): कोल्हापूर मधील एका खाजगी बँकेमध्ये पिग्मी कलेक्शनचं काम पाहणारा तरुण बेवारस स्थिती मध्ये व बिघडलेल्या मनस्थितीत जराजर्जर होऊन कणकवलीतील उड्डाणपूला नजीक आढळला. याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदिप परब यांच्या संविता आश्रमाने देवासारखी धाव घेऊन या रुग्णाला पोलिसां समक्ष आपल्या ताब्यात घेतले. आणि त्याच्या पुनर्वसनासाठी संविता आश्रमात त्याला मायेचा आधार देत दाखल केले. कणकवली एस. एम. हायस्कूल समोरील उड्डाणपुलाखाली सर्विस रस्त्यावर निराधार व्यक्ती काळजी वाटावी अशा स्थितीतअसल्याची माहिती कणकवली येथील सुधीर श्यामसुंदर मर्ये यांनी पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमचे संस्थापक व जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांना दिली. संदिप परब यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह कणकवलीत दाखल होवून निराधार व्यक्तीला संविता आश्रम मध्ये दाखल केले. त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता तो आपले नाव विनोद विलासराव चौगुले (वय सुमारे ४०, रा. कोल्हापूर -फुलेवाडी) असे सांगितले. विनोद चौगुले हा गेल्या पाच दिवसापासून एसएम हायस्कूल समोरील रस्त्यावर राहत होता. त्याला नीट चालता येत नसल्याने तो तिथेच काही मिळेल ते खाऊन आपली उपजीविका करत होता. येथीलच एम आर एफ टायरच्या शोरूममध्ये कामाला असलेले सुधीर मर्ये यांना सविता आश्रम बद्दल माहिती मिळताच त्यांनी आश्रमशी संपर्क साधला. त्यानंतर संविता आश्रमचे संदिप परब हे तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसोबत कणकवलीत दाखल झाल्यानंतर त्यांनी निराधार विनोद चौगुले याची विचारपूस करून त्यास नवीन कपडे घालून संविता आश्रमात नेण्यात आले. त्यामुळे निराधार विनोद चौगुले याला आधार मिळाला. दरम्यान संविता आश्रमला वेळोवेळी आर्थिक मदत करणारे कणकवली येथील सेवानिवृत्त अधिकारी मनोहर पालयेकर यांनी रुपये दहा हजाराची देणगी संविता आश्रमाकडे सुपूर्द केली. संदिप परब यांच्या संविता आश्रमचे काम हे महान आहे.या कामाला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे त्यामुळे संविता आश्रमाला मदत करण्यात जनतेने सातत्त ठेवावे असे आवाहन मनोहर पालयेकर यांनी यावेळी केले.यावेळी संविता आश्रमचे विजय नाईक, आशिष कांबळी, विजेंद्र परब, मनोहर पालयेकर, अशोक करंबळेकर कोकण नाऊचे वरिष्ठ पत्रकार विजय शेट्टी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!