कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा कलमठ गावडेवाडी शाळेतील बालगोपाळांनी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावरती गोपाळकाला व दहीहंडी उत्सव शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला. शाळेच्या मुख्याध्यापक रश्मी आंगणे आणि सहशिक्षिका शितल गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शुभांगी पवार व त्यांच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांनी गोपाल कृष्णाचे आणि मुलींनी गोपिकांचे वेश परिधान करून गाण्यांच्या ठेक्यात, तालावर नाचून- गाऊन तीन थरांची दहीहंडी रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला .यावेळी पालकांनी सुद्धा शाळेच्या या उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले . मुख्याध्यापक रश्मी आंगणे यांनी दहीहंडीची पौराणिक पार्श्वभूमी, गोष्टीरूपात मुलांना कथन केली आणि या सणाचे महत्त्व विशद केले. सर्व बालकांच्या आयुष्यामध्ये बाल कृष्णाच्या लीला खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच हा दहीहंडी कार्यक्रम सगळ्या बालगोपाळांच्या आवडीचा असतो हे आवर्जून सांगितले. सर्वानी दहीहंडीचा प्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सदस्य उपस्थित होते.












