विशेष संपादकीय
राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून नवी मुंबई नंतर कोकणातील पहिले मार्केटयार्ड कणकवली तालुक्यात नांदगाव मध्ये साकारत आहे. आमदार नितेश राणेंनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 ऑगस्ट 2023 रोजी मागणी केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आधीच महाराष्ट्र पणन विभागाकडून मार्केट यार्ड चा प्रस्ताव मंजूर होऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी स्तरावर प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे हे विशेष होय. नांदगाव रेल्वे स्टेशनलगत सुमारे 10 एकर जागेत हे मार्केट यार्ड उभारण्यात येणार असून सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती च्या माध्यमातून ही जमीन राज्यशासन खरेदी करेल अथवा दीर्घकालीन मुदतीवर लिज ने घेईल. भूसंपादन ची कारवाई आता जिल्हाधिकारी स्तरावर सुरू झाली आहे हे विशेष आहे. एरव्ही कोणतेही शासकीय काम एवढ्या जलदगतीने होताना दिसून येत नाही. मात्र जेव्हा आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्याकडे 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव मध्ये भव्य मार्केट यार्ड निर्मिती च्या मागणीस मंजूरी देण्याचे पत्र दिले तेव्हा नामदार अब्दुल सत्तार यांनी एकही क्षण न दवडता त्या पत्रावरच पणन विभागाच्या उपसचिवांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. या संपादकीय लेखात मुद्दाम त्या पत्राची फोटो कॉपी आम्ही प्रसिद्ध केली आहे. आजवर सिंधुदुर्ग च्या विकासाच्या अनेक घोषणा अनेक मागण्या झाल्या.. पण अपवाद वगळता प्रत्यक्ष कार्यवाही हवेतच राहिली.विशेषतः निसर्गाने भरभरून दान दिलेल्या आपल्या सिंधुदुर्गच्या विकासासाठी इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवरच इथला भूमिपुत्र सधन संपन्न होऊ शकतो हा ऐकायला सुखद वाटणारा विचार केवळ भाषणातच राहिला. इथला सर्वसामान्य शेतकरी जो शेतमाल पिकवतो त्याला वाजवी भाव मिळायचा असेल तर आपल्या सिंधुदुर्गातच मार्केट यार्ड असणे गरजेचे आहे. एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांची मान मोडून काढेल अशा दलालांच्या नफेखोरीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला कधीच जेवढा मिळायला हवा तेवढा भाव मिळत नाही.आधी आपला फायदा नंतर शेतकरी हे एपीएमसी मधील दलालांचे तत्व ठरलेले आहे. सिंधुदुर्गातून साडेचारशे किलोमीटर अंतर दूर असलेल्या एपीएमसी मार्केट मध्ये आपला शेतमाल नेल्यानंतर दलाल ठरवेल तो दर गपगुमान शेतकऱ्याला मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याऐवजी जर हा साडेचारशे किलोमीटर अंतराचा वाहतूक खर्च कमी होऊन माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळायचा असेल तर सिंधदुर्गातच मार्केट यार्ड असायला हवे हा सर्वसामान्य शेतकरी हिताचा विचार आमदार नितेश राणेंनी केला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत मार्केटयार्ड मंजुरीसाठी मंत्रालयीन पातळीवर मागील पावणे दोन महिने सातत्याने पाठपुरावा केला. आ. नितेश राणेंनी घेतलेल्या भक्कम फॉलोअप मुळेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्केटयार्ड चे स्वप्न येत्या काही महिन्यांत साकार होणार आहे. अवघ्या पावणे दोन महिन्यांत मार्केट यार्ड ला तत्वतः मंजुरी मिळवणे सोपे नाही.भले जरी सत्ताधारी आमदार असला तरी या मंजुरीसाठी त्यांच्या नाकीनऊ येतात.जर आमदाराचे मंत्रिमंडळात तेवढे वजन असेल तरच हे काम सोपे होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असलेल्या आणि प्रखर हिंदुत्ववादी भाजपा प्रवक्ते असलेल्या आमदार नितेश राणे यांनी स्वप्नवत असलेल्या सिंधुदुर्गातील मार्केट यार्ड निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली आहे.इथे मुद्दाम आमदार नितेश राणे यांनी मार्केट यार्डसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक यासाठी करावेसे वाटतेय की मार्केट यार्ड ला झगमगाटी रूप नसले तरी उन्हातान्हात आपली काया करपवून घेऊन आपल्या घामातून जो आम किसान शेतमाल पिकवतो त्याला सधन करण्यासाठी, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात शेतमाल विकून त्याच्या हक्काची वाजवी रक्कम येण्यासाठी आणि अर्थातच त्यातून त्याच्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होण्यासाठी हे मार्केट यार्ड नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड चा हापूस हा सगळ्या हापूस चा बापूस म्हटला जातो. साखरेसारखी जिभेवर रेंगाळणारी मधुर चव चाखायची असेल तर जगाच्या पाठीवर देवगड च्या हापूस ला पर्याय नाही. मात्र भले देवगडात पिकत असला तरी हा सगळ्यांचा बापुस असलेला हापूस विक्रीसाठी मात्र न्यावा लागतो एपीएमसी मध्ये.. नवी मुंबई च्या मार्केट यार्डात.. कारण काय ? तर पिकते तिथे विकत नाही आणि विकत नाही कारण मोठे मार्केट नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, मच्छीमार,नारळ सुपारी, साग, फणस सह जंगली लाकूड उत्पादक शेतकऱ्याची हीच मोठी शोकांतिका आजवर आहे की अमाप पीक असूनही मार्केट यार्डअभावी वाजवी भाव मिळत नाही.सबब दलाल जो ठरवेल तो भाव पदरात पाडून घेण्याशिवाय सिंधुदुर्गातील शेतकऱ्याकडे आजवर पर्याय नाही आहे. परंतु नांदगाव रेल्वे स्टेशननजीक साकारत असलेल्या मार्केट यार्ड मुळे भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य तो भाव मिळेल आणि येथील सर्वसामान्य शेतकरी सधन समृद्ध होईल ही काळ्या दगडावरची रेघ म्हणावी लागेल.












