मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला.दरम्यान, तिकडे दादर चौपाटीवरही मुसळधार पाऊस कोसळला. एकीकडे गणपती विसर्जनासाठी गणेश मंडळांची धामधूम सुरु होती. त्यातच मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. दादर परिसरात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. जोरदार पाऊस कोसळत असताना सुद्धा मुंबईकरांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यंदा समुद्र चौपाटीवर सर्वसामान्य नागरिकांना जायला बंदी करण्यात आली असून, मुंबई महानगरपालिकेचे जीव रक्षक दलाचे कर्मचारी गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेऊन स्वतः समुद्रात जाऊन विधिवत विसर्जन करत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार दुपारनंतर राज्याच्या विविध भागात पाऊस बरसला. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज होता. तो वरुणराजाने खरा ठरवला.