आरोहन व जे.एस.डब्ल्यू फाऊंडेशन द्वारा जव्हार येथे तालुकास्तरीय रानभाजी स्पर्धा व प्रदर्शन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): राष्ट्रीय पोषण महिन्याचे औचित्य साधून कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांचे योगदान व ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी याविषयी जन-मानसामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘आरोहन’ संस्था व जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे नुकतेच तालुकास्तरिय रानभाजी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजयाताई लहारे, उपसभापती दिलीप पाडवी,जव्हार तहसीदार मान. लता धोत्रे, जे. एस. डब्ल्यू.फाऊंडेशन मुंबईच्या पाणी, पर्यावरण व स्वच्छता विभागाच्या विभाग प्रमुख रुपा दवणे व लोकेशन हेड अमोल सूर्यवंशी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती जव्हारच्या सभापती व उपसभापती यांनी या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या बचत गटांचे अभिनंदन करून रानभाज्यांच्या व्यवसायाला चालना देवून त्याकडे स्थानिक बाजारपेठ म्हणून कसे पाहता येईल व कुपोषण निर्मुलनासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल याबाबत मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तहसीलदार यांनी रानभाज्यां पासून एवढ्या प्रकारचे विविध पदार्थ बनविता येत असल्याचे प्रथमच पाहिले असल्याची भावना व्यक्त करून याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोहन चे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप खैरकर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये आरोहन संस्थेच्या कामाची पार्श्वभूमी सांगून शासनाच्या पोषण मिशन कार्यक्रमाची माहिती दिली. २०२२ पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते, परंतु ते कधी साध्य होईल माहिती नाही त्यामुळे आता कुपोषण मुक्तीसाठी स्थानिक महिला बचत गटांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या स्पर्धा व प्रदर्शनामध्ये सुमारे २० महिला बचत गटांनी सहभाग नोंदवून रानभाज्यांपासून बनविलेल्या जवळपास १५० हून अधिक पाककृती बनवून आणल्या होत्या. काळीधोंडच्या सोनाली महिला बचत गटाने तब्बल १५ पाककृती बनवून आणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्पर्धा परीक्षक समितीने सर्व गटांनी बनवून आणलेले पदार्थ व रानभाज्या यांची पाहणी व निरीक्षण करून प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमांक घोषित केले. प्रथम क्रमांक काळीधोंड च्या सोनाली बचत गटाने पटकावला. द्वितीय क्रमांक सप्तशृंगी बचत गट जामसर यांनी तर तृतीय क्रमांक मयुरी बचत गट कशिवली नंबर २ यांनी मिळवला.उत्तेजनार्थ बक्षीस महालक्ष्मी बचत गट वडोली व सावरपाडा यांना मिळाला. सर्व विजेत्या क्रमांक प्राप्त गटांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना प्रशस्ती पत्र देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या एन.आर.सी. विभागाच्या आहारतज्ञ अंजली दरोगे, सेवानिवृत्त प्राध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रज्ञा कुलकर्णी , स्थानिक रानभाज्यांचे जाणकार तथा शिक्षक पांडुरंग पिलाने व यशदाचे प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांनी अतिशय काटेकोरपणे आपली भूमिका निभावली. उपस्थित महिलांना प्रज्ञा कुलकर्णी, मनोज कामडी व पिलाने यांनी रानभाज्या चे आहारातील महत्व, जंगली वनस्पतीची वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे, तसेच स्थानिक ढाबा किंवा हॉटेल मध्ये सदर रानभाज्यां चे मेनू कार्ड बनवून भाज्यांचा आहारात समावेश केला तर आर्थिक फायदा होऊ शकतो याविषयीआपले मनोगत व्यक्त करून महिलांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनाला विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी , शासकीय अधिकारी-कर्मचारी , जव्हार तालुक्यातील के. व्ही हायस्कूल , युनिव्हर्सल स्कुल , इतर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक , स्थानिक नागरिक अशा सुमारे ५०० हून अधिक दर्शकांनी भेट देवून रानभाज्यांची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमासाठी आरोहन चे प्रकल्प व्यवस्थापक नितेश मुकणे, कौस्तुभ घरत, प्रीतम नरोन्हा, प्रकल्प अधिकारी माधुरी मुकणे, बालाजी परसुटकर, कृष्णा बाजारे, मीनाक्षी खिरारी, जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशन जव्हारचे कार्यक्रम प्रमुख संतोष महाजन, खरोंडा शेतकरी उत्पादक संघाचे संचालक गणपत भेसकर आदि मान्यवर उपस्थित होते. आरोहन चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नारकर यांनी कार्यक्रमाला प्रोत्साहन देवून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भुरे व ललिता गवळी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!