इतरांची घरं रंगवणारा माणूस कणकवलीत जगत होता निराधार जीवन
खारेपाटण (प्रतिनिधी): आयुष्यभर इतरांची घरं रंगवून त्यांच्या जीवनात रंग भरणारे, आनंद निर्माण करणारे एक कारागीर मजूर प्रकाश अर्जुन बाचरे (वय वर्षेः ५९) हे आयुष्याच्या संध्याकाळी कणकवली शहरात निराधार जीवन जगत असलेले नुकतेच आढळून आले. कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिराजवळील एका निर्जन बस स्टाँपवर गेले महिना दिड महिन्यापासून प्रकाश बाचरे हे अत्यंत हलाखीच्या आणि निराधार स्थीतीत आजारी अवस्थेत जीवन जगत असल्याची माहिती जीवन आनंद संस्थेचे संदिप परब यांना समजली. त्यानंतर संदिप यांनी तात्काळ संस्थेचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत,चंद्रकांत पालव व विजय नाईक यांचे टिमसह कणकवली गाठली. कणकवलीत पोहचल्यावर संदिप सर यांनी सर्वप्रथम प्रकाश यांस स्वहस्ते आंघोळ घातली व त्याची दाढी केली. कणकवली पोलिस स्टेशनच्या माध्यमातून पोलिस पत्राआधारे प्रकाश बाचरे यांना आश्रय आणि सुरक्षेसाठी पणदूर येथील संविता आश्रमात दाखल केले, तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष समिर नलावडे , रोटरी क्लबचे सदस्य दिपक बेलवलकर आणि श्री. कोदे यांचेसह कणकवलीचे अनेक ग्रामस्थ उपस्थीत होते. या सर्वांचे सविता आश्रमच्या टिमला चांगले सहकार्य लाभले. याबरोबरच कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अमित यादव यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. प्रकाश अर्जुन बाचरे हे गेले दहा वर्षांहून अधिक काळ बेघर आणि निराधार जिवन जगत असून त्यांचे मुळगाव गणपतीपुळे असल्याचे समजते.