रावराणे महाविद्यालयात जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ च्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रम
वैभववाडी (प्रतिनिधी): धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरांना प्रतिबंध करणारा जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा एक महत्त्वाचा कायदा आहे. सदर कायदा समजून घेऊन त्याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असे आवाहन अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विवेक विचार कक्षाच्यावतीने (RTC) जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ च्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर जनसंवाद यात्रेतील अंनिसचे कार्यकर्त्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, भगवान रणदिवे व अनंत पवार उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेला जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा सर्वांसाठी आहे. या कायद्यातील एकूण बारा कलमे याबाबत सविस्तर माहिती नंदिनी जाधव यांनी दिली. भगवान रणदिवे यांनी पाणी व बिनवातेचा दिवा पेटवून तसेच अंगात येण आणि जिभेवर कापूर पेटवून खाण्याचा चमत्काराचे सादरीकरण करुन दाखवले. मिलिंद देशमुख यांनी महाराष्ट्र अंनिस’ च्या कामाची ओळख करून देत समाजामध्ये असणाऱ्या विविध अंधश्रद्धा आणि त्याविषयीचे कायदे याबाबतची माहिती दिली. तसेच आरोग्य हीच संपत्ती आणि निर्व्यसनी कसे राहावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नाने यश मिळवता येते यावर विश्वास ठेवावा असे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख प्रा. एस. एन. पाटील यांनी करुन दिली तर आभार प्रा.सौ. एस. एस. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘विवेक विचार कक्षा’चे प्रा.डॉ. आर.एम. गुलदे, प्रा. डॉ. डी. बी. शिरगावकर यांनी विशेष प्रयत्न काम केले.











