ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावी बोर्ड परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान घेतली जाणार आहे. या कालावधीत कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे याची माहिती मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahasscboard.in वर 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. याआधी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. आज अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.