देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पर्यटन समिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत, कुणकेश्वर कातवण रापण संघ व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रापण महोत्सवाला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छीमारी कशी केली जाते याची माहिती लोकांना व्हावी तसेच पर्यटकांना त्याची ओळख व्हावी यासाठी महोत्सव आयोजकांना धन्यवाद दिले. महोत्सवाचे स्वरूप व उत्साह पाहता या महोत्सवाची व्याप्ती वाढवावी लागणार असे आयोजकांना सूचित केले. चित्रपट शूटिंग, निर्मितीचं ठिकाण अशी देवगडची ओळख बनली पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. यामुळे स्थानिक मुलांना रोजगाराच्या संधी तसेच व्यापारी वर्गाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल. पर्यटनाच्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट व अड्व्हेंचर चा विचार आज ना उद्या करणे गरजेचे आहे.
मच्छीमार वर्गाच्या नवीन पिढीला वॉटर स्पोर्ट चे आकर्षण आहे. मात्र त्या व्यवसायाची सुरुवात कशी करायची या सर्व गोष्टींची माहिती रापण महोत्सवाच्या माध्यमातून पुढे आणण्याची गरज आहे. यासाठी लागणारी जी मदत आहे ती करण्यासाठी मी तयार आहे. जिल्हा बँकेची मदतही घेऊ भावी पिढीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काय वेगळं करू शकतो यावर विचार होणे गरजेचे आहे. दरवर्षी रापण महोत्सव मोठ्यात मोठा करत जाऊ असे अभिवचन आमदार नितेश राणे यांनी दिले.














