टेलिमेडिसिन सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर राष्ट्रीय कर्करोग दिवस साजरा

चौके ( अमोल गोसावी ) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच टेलीमेडिसिन केंद्रा मार्फत ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर या केंद्रावर देखील कर्करोगाविषयी जनजागृती करून साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे टेलीमेडिसीन प्रकल्पाचे समन्वयक प्रतीक दुसेजा व सुमित सावंत यांनी दिली.

दरम्यान ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग दिवस म्हणून देशभर साजरा केला जात असून या सर्व टेलीमेडिसीन सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रावर कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांना या रोगाची लक्षणे, हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच योग्य उपचार यांची माहिती या सर्व केंद्रावर देण्यात आली. कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक योजना कार्यक्रम शासन राबवित असते. या कार्यक्रमाला देखील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले सहकार्य करून हा राष्ट्रीय कर्करोग दिवस यशस्वी केला.

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दहा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा टेली मेडिसिन प्रकल्पाची सुरुवात करून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपचार करण्याची नाविन्यपूर्ण सुविधा या जिल्ह्यात निर्माण करून दिली. सध्या जिल्ह्यातील मोरगाव, बांदा,रेडी, निरवडे, माणगाव, पणदुर, चौके, गोळवण, मसुरे, आचरा अशा दहा ठिकाणी ही सुविधा कार्यरत आहे. अशी माहिती प्रकल्पाचे उपसमन्वयक सुमित सावंत यांनी दिली.

error: Content is protected !!